अमरावती : आपल्यानंतर मुलीचे काय, तिला अन्य कुणाच्या जबाबदारीवर सोडू शकत नाही, त्यामुळे तिलाही सोबत घेऊन जात असल्याची सुसाईड नोट लिहून ठेवत मायलेकीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उशिरा रात्री उघड झाली. स्थानिक खोलापूरी गेट परिसरात राहणारी एक ३५ वर्षीय महिला व तिची दहा वर्षीय शाळकरी मुलगी गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आल्या. याप्रकरणी २१ जानेवारी रोजी पहाटे आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.
खोलापुरी गेट पोलिसांनुसार, भाग्यश्री दीपक भले (३५) आणि स्वरा दीपक भले (१०, दोघीही रा. खोलापूरी गेट, अमरावती) असे मृत आई व मुलीचे नाव आहे. नेमकी आधी कुणी आत्महत्या केली, की चिमुकलीला फासावर चढवून महिलेने गळफास लावून घेतला, ते जाणून घेण्यासाठी खोलापुरी गेट पोलिसांना शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. एकाचवेळी आई व मुलीच्या आत्महत्येने समाजमन सुन्न झाले आहे. गतवर्षी लक्ष्मीपुजनाच्या दिवशी रात्री अभियंता मुलगी आणि तिच्या आईचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत घरात आढळून आला होता. शिक्षक सन्मती कॉलनीतील सुवर्णा प्रदीप वानखडे (५१) आणि मृणाल प्रदीप वानखडे (२५) या मायलेकीच्या आत्महत्येची आठवण ताजी झाली आहे.
भाग्यश्री राहत होत्या माहेरी
भाग्यश्री स्वरा या मुलीसह खोलापुरी गेट परिसरातील माहेरी राहत होत्या. शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या माहेरी कोणीही नसताना त्यांनी मुलीला गळफास देवून स्वत:ही गळफास घेवून आत्मघात करवून घेतला. या प्रकरणाची माहिती भाग्यश्री यांचे मावस भाऊ आनंद शिरसाठ यांना मिळताच त्यांनी तत्काळ भाग्यश्री यांच्या आईच्या घरी धाव घेतली. मात्र, तत्पुर्वीच भाग्यश्री व स्वरा यांचा मृत्यू झाला होता. जिल्हा सामान्य रूग्णालयातील डॉक्टरांनी तपासून दोघींनाही मृत घोषित केले. स्वरा ही तिसऱ्या वर्गाची विद्यार्थिनी होती. माहेरी भाग्यश्री यांची आई सकाळीच बाहेरगावी गेली होती. सायंकाळच्या सुमारास ती परत आली असता, दार आतून बंद होते. शेजाऱ्यांच्या मदतीने आत जाऊन पाहिले असता, किचनच्या ओट्याजवळ घराच्या छताला मायलेकीचे मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत होते.
जीवनाला कंटाळून आत्महत्या
खोलापुरी गेट पोलिसांना घटनास्थळाहून भाग्यश्री यांनी मृत्यूपुर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळाली आहे. आयुष्याला कंटाळून आत्महत्येचा निर्णय घेत आहे. आपल्या आत्महत्येची चौकशी करू नये, त्याबाबत कुणाला दोष देखील देऊ नये, मुलीला कुणाच्या जबाबदारीवर सोडू शकत नाही, माझ्या मृत्यूनंतर मुलीचे काय होणार, या काळजीपोटी मुलीलासुध्दासोबत घेवून आत्महत्या करत असल्याचे त्यात नमूद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. भाग्यश्री ही धुणीभांडी करत होती.