अमरावती : जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवन ठप्प झाले आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहत असून कित्येक गावांचा संपर्क तुटला आहे. अशातच मुसळधार पावसाने आणखी दोघांचा बळी घेतला आहे. चांदुर बाजार तालुक्यात घर कोसळून माय-लेकीचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला.
चांदुर बाजार तालुक्यातील फुबगाव सैदापूर येथे आज (दि. १९) सकाळी पाच वाजताच्या सुमारास अरुण नारायण वैराळे यांचे घर पावसाने कोसळल्याने त्यात पत्नी चंदा अरुण वैराळे (३५), मुलगी पायल वैराळे (७) यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर नारायण वैराळे, अरुण वैराळे,ओम वैराळे(१०) हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच चांदूर बाजारचे तहसीलदार धीरज स्तुल व ठाणेदार सुनील किणगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यात घरातील पाचही व्यक्तींना बाहेर काढण्यात आले. मात्र यात माय लेकीचा मृत्यू झाला. जखमी व्यक्तींना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बच्चू कडूंची भेट; ५० हजारांची मदत
माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी फुबगाव गाठले. यावेळी त्यांनी स्वतः ५० हजारांची मदत देऊन वऱ्हाडे कुटुंबीयांचे सांत्वन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून मुख्यमंत्री सहायता निधीतून वऱ्हाडे कुटुंबाला पाच लाखाची मदत देण्यात येणार असल्याची माहिती दिली. या कुटुंबाला तत्काळ घर बांधून देण्यात आहे. याबाबत अधिक मदतीकरिता प्रशासनाला त्यांनी सूचना केल्या.