लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रसूतीदरम्यान अति रक्तस्त्रावाने महिलेची प्रकृती खालावली व उपचारादरम्यान रविवारी तिचा मृत्यू झाला. ही घटना येथील बोंडे हायटेक क्रिटिकल हॉस्पिटल येथे घडली.अवंतिका ऊर्फ शिल्पा अमोल इंगळे (२९, रा. सरस्वतीनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. प्रसूतीचा कालावधी पूर्ण झाल्याने स्त्रीरोगतज्ज्ञ शोभा पोटोडे यांनी तिची नॉर्मल प्रसूती केली. एका गोंडस मुलीला जन्मही दिला. परंतु, प्रसूती दरम्यान अति रक्तस्त्राव झाल्याने तिचा रक्तचाप कमी झाला. तसेच पोटात गर्भ असतानाच सदर महिलेस डेंग्यू आजार झाल्याने तिच्या शरीरातील पांढऱ्यापेशी कमी झाल्या होत्या. त्यामुळे प्रकृती खालावल्याने तिला शनिवारी सायंकाळी बोंडे हायटेक क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, रविवारी सकाळी ६.३० वाजता महिला दगाविल्याची माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली. यानंतर नेमके मृत्यूचे कारण काय? ही बाब नातेवाईकांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला व इन कॅमेरा श्वविच्छेदन करण्याची मागणी केली. सांयकाळी त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला.अवंतिका या गर्भवती असल्याने त्यांना डॉ. पोटोडे हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी १० आॅक्टोबरला दाखल केले होते. प्रसूतीला दोन ते तीन दिवस अवधी असल्याने व त्यांना ताप आल्याने डेंग्यू चाचणीसाठी रक्तजल नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये डेंग्यूसाठी उपयुक्त असलेली एनएस-वन ही चाचणी पॉझिटिव्ह आली. यानंतर शनिवारी ५.३० वाजता दरम्यान त्यांची नॉर्मल प्रसूती करण्यात आली. एका गोंडस मुलीचा जन्मही झाला. मात्र अधिक रक्तस्त्रावामुळे रक्तचाप फारच कमी झाल्याने, तसेच पूर्वीच डेंग्यू असल्याने बाळाचा चेहरा पाहण्याआधीच त्यांची प्रकृती गंभीर झाली. डॉ. शोभा पोटोडे यांनी महिलेला बोंडे हायटेक क्रिटिकल हॉस्पिटलला पुढील उपचारासाठी दाखल करण्याचा नातेवाईकांना सल्ला दिला. यानंतर त्यांना आॅक्सिजनवर ठेवून उपचार सुरू करण्यात आला. बोंडे हॉस्पिटलमध्ये १२ तास उपचार झाल्यानंतर रविवारी सकाळी ६.३० वाजता अवंतिका यांचा मृत्यू झाला. मात्र, मृत्यू नेमका कुठल्या कारणाने झाला, यासंदर्भात डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही. महिलेवर रविवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. बाळाला येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरखीत ठेवण्यात आले असून, प्रकृती चांगली असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. सदर महिलेचे माहेर हे साईनगर परिसरातील आहे. प्रसूतीपूर्वी त्यांना माहेरी ठेवण्यात आले होते. या परिसरात सर्वाधिक डेंग्यूचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. विशेषत: यापूर्वी मृताच्या दोन्ही भावांना डेंग्यू झाला होता.