विद्युत प्रवाहाचा झटका : दहिसाथ परिसरातील घटनाअमरावती : दोन दिवसांपूर्वी नवीन घरात गृहप्रवेशाचा कार्यक्रम आटोपला. रविवारी मुलीच्या पहिल्या वाढदिवसाची तयारीला लागलेल्या आईचा विद्युत प्रवाहाच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना शनिवारी ११.३० वाजतादरम्यान दहिसाथ परिसरात घडली. यामुळे परिसरातील नागरिकांत हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस सूत्रानुसार, आरती सागर गौड (२८,रा. दहीसाथ) असे मृताचे नाव आहे. आरती गौड या शहरातील खामगाव बँकेच्या एका शाखेत कार्यरत होत्या. त्यांचे पती सागर गौड हे गडचिरोली जिल्ह्यातील इटापल्ली येथे पोलीस विभागात कार्यरत आहेत. गौड यांनी दहिसाथ परिसरात नवीन घर बांधले. दोन दिवसांपूर्वी गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यासाठी सागर हे रजा घेऊन आले होते. पती-पत्नीने विधिवत पूजा करून गृहप्रवेशाचा कार्यक्रम पार पाडला. यासाठी त्यांचे बहुतांश नातेवाईक हजर होते. त्यामुळे त्यांचे घर गजबजले होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर गौड कुटुंबियातील सदस्य देवांशीचा वाढदिवस साजरा करणार होते. गौड दाम्पत्याची एकुलती एक मुलगी देवांशी ही रविवारी ९ एप्रिल रोजी एक वर्षाची होणार होती. देवांशीचा वाढदिवस थाटात साजरा करण्याचे स्वप्न पती-पत्नीसह कुटुंबियांनी रंगविले होते. तिच्या वाढदिवसाची जय्यत तयारी सुरू असताना आरती व त्यांच्या नणंदेने घराची स्वच्छता करण्याचे ठरविले. त्यासाठी आरती घरातील झाडू शोधू लागल्या. दरम्यान त्यांना घरातील कुलरमागे झाडू असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी झाडू उचलण्याचा जसा प्रयत्न केला, तसाच त्यांच्या हाताचा कुलरला स्पर्श झाला आणि अचानक विद्युत प्रवाहाचा झटका आरती यांना बसला. आरती या कुलरला चिपकल्याचे निदर्शनास येताच कुटुंबीयांतील काही सदस्यांनी कुलरजवळील लाकडी सोफ्याद्वारे आरती यांना कुलरपासून दूर केले. मात्र, आरती या बेशुद्ध झाल्या होत्या. या घटनेची माहिती होताच माजी खासदार अनंत गुढे यांच्यासह गौड कुटुंबियांनी आरती यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. मात्र, आरती यांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आरती यांच्या मृतदेहाचे इर्विन रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. कौटुंबिक कार्यक्रमाच्या आनंदात ही दु:खद घटना घडल्यामुळे दहिसाथ परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
मुलीच्या वाढदिवसाआधीच आईचा शॉक लागून मृत्यू
By admin | Published: April 09, 2017 12:02 AM