अमरावती : एक वर्षापूर्वी पतीचे दुर्धर आजाराने मृत्यू झाल्यानंतर तिने नेटाने मुलाच्या संगोपनासाठी कष्ट घेतले. मात्र, परिस्थितीच्या रेट्याने तिचा निर्धार डळमळीत झाला आणि विषाचा प्याला जवळ करीत तिने स्वत:ला संपविले. त्यापूर्वी मुलालाही तिने विष दिले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांची या दोघांना वाचविण्याची धडपड व्यर्थ ठरली. मायलेकाच्या मृत्यूने हमालपुरा परिसर हादरला आहे.
पोलिस सूत्रांनुसार, योगिता गजानन वाघाडे (३५, हमालपुरा) आणि अथर्व गजानन वाघाडे (१२) अशी मृतांची नावे आहेत. राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हमालपुरा येथे मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. योगिताच्या पतीचे वर्षभरापूर्वीच दुर्धर आजाराने निधन झाले होते. त्यामुळे योगितावर कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली. ती अंगमेहनत करून मुलाचे संगोपन करीत होती. मंगळवारी शेजाऱ्यांना ती निदर्शनास न आल्याने त्यांनी घरात डोकावले. त्यावेळी योगिताच्या तोंडातून फेस येत असल्याचे आढळले. शेजाऱ्यांनी मिळून योगिताला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने उपचारार्थ त्यांना अतिदक्षता विभागात नेण्यात आले. तातडीने सलाईन लावून उपचार सुरू करण्यात आले.
योगितावर उपचार केले जात असतानाच अथर्वलाही भोवळ येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे घटनास्थळी उपस्थित डॉक्टरांनी संशयावरून त्याची चौकशी केली असता, योगिताने त्याला द्रव प्यायला दिले होते, असे त्याने सांगितले. तथापि, तोपर्यंत विषाचा अंमल त्याच्यावरही पूर्णपणे झाला होता. त्याला तातडीने ओपीडीमध्ये दाखल करून सलाईन आणि ऑक्सिजन देण्यात आले. या मायलेकाला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.