अमरावती: महापालिका आयुक्तांच्या कार्यालयीन दालनाच्या दारावर आईंच्या नावाचा उल्लेख असलेला नामफलक झळकला आहे. आता तेथे देविदास पवारऐवजी देविदास गिरजाबाई गंगाधर पवार, प्रशासक तथा आयुक्त अशी पाटी लावण्यात आली आहे. शुक्रवारी तो बदल करण्यात आला.
तत्पुर्वी, नवनियुक्त उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी गुरूवारी आपल्या कार्यालयात नरेंद्र कमल श्रीरामजी वानखडे असे नामफलक लावले आहे. त्याचा कित्ता गिरवत आयुक्तांच्या नामफलकावर त्यांच्या आईचे नाव झळकले आहे. चांदूरबाजार तहसील कार्यालयातील निवडणूक नायब तहसीलदार प्रथमेश मिना गजानन मोहोड हे आईचे नाव नामफलकात समाविष्ट करणारे जिल्ह्यातील पहिले अधिकारी ठरले होते.
राज्यातील शिंदे सरकारने सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये आईचे नाव असणे अनिवार्य केले आहे. सरकारने केलेल्या नियमानुसार तुमचे नाव त्यानंतर अनुक्रमे आई व नंतर वडिलांचे नाव, त्यानंतर आडनाव असणे गरजेचे आहे. मार्च महिन्यात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी त्यांच्या नावाचे फलक प्रकाशित केले. राज्य सरकारचा हा निर्णय १ मे पासून लागू झाला आहे.