अमरावती : गर्भवती महिलेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून आरोग्य सुधारणा व्हावी, जन्माला येणाऱ्या नवजात बालकांची आरोग्य सुधारावे आणि माता तसेच बालमृत्यूला ब्रेक लागावा, यासाठी शासनाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ८ डिसेंबर २०१७ पासून सुरू केली आहे. या योजनेंतर्गत तीन टप्प्यात गदोदर मातांना पाच हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना केंद्र शासनाच्या महिलाा व बाल कल्याण विभागाची आहे. मात्र, राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून राबविली जाते. या योजनेंतर्गत १ जानेवारी २०१७ ते ३१ मार्च २०२२ पर्यंत ६७ हजार ८९७ एवढे उदिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ६१ हजार ९५८ लाभार्थ्यांना आतापर्यंत लाभ देण्यात आला आहे. पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे २६ कोटी ५१ लाख रुपयांचे अनुदान वितरित केले आहे. यामध्ये जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील लाभार्थींचा समावेश आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी आरोग्य विभागामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार केली जात आहे.
बॉक्स
तीन टप्प्यात मिळणार पैसे
पहिल्या हप्त्यात मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १८० दिवसांत गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर अनुदान दिले जाते.
दुसऱ्या हप्त्यात किमान एकदा प्रसूतिपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेचे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर अनुदानाची रक्कम दिली जाते.
तिसऱ्या हप्त्यात प्रसूतीनंतर झालेल्या अपत्याची जन्म नोंदणी व बालकास बीसीजी ओपीव्ही, डीपीटी आणि हिपॅटायटीस बी व त्या आनुषंगिक लसीकरणाचा पहिला डोस दिल्यानंतर अनुदानाची रक्कम दिली जाते.
बॉक्स
पात्रतेचे निकष काय?
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही सर्व महिलासाठी राबविली जाते. मात्र, या योजनेचा लाभ केवळ पहिल्या अपत्यासाठीच्या मातांनाच तीन टप्प्यात दिला जातो. यासाठीचे निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.
बॉक्स
पहिला हप्ता १०००
दुसरा हप्ता २०००
तिसरा हप्ता २०००
बॉक्स
लाभासाठी कुठे करायचा संपर्क?
योजनेच्या नोंदणीसाठी गरोदर महिलांनी पहिल्या तीन महिन्यात गरोदरपणाची नोंद शासकीय आरोग्य केंद्रात करावी, याकरिता गरोदर मातांना स्वत:च्या व पतीच्या आधार कार्ड व अन्य आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. याकरीता प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा आरोग्य सेवक यांच्यामार्फत ऑनलाईन अर्ज केले जातात.
कोट
प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना अंतर्गत जिल्ह्यातील ६१ हजारांवर महिलांना लाभ देण्यात आला आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत जिल्ह्यात चांगले काम झाले असून, लाभार्थींच्या बँक खात्यात अनुदान वितरित करण्यात आले आहे. या योजनेचा शेवटच्या घटकाला लाभ देण्याकरता यंत्रणा प्रयत्नरत आहे.
डॉ. दिलीप रणमले जिल्हा आरोग्य अधिकारी