अमरावती : जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांचे मागील चार महिन्यांपासून रखडलेले मानधन त्वरित देण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी सेविकांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाने शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले.जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांचे माहे जून ते सष्टेंबरपर्यंतचे प्रलंबित असलेले मानधन देण्यात न आल्याने अखेर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) ने प्रलंबित मानधन व प्रवास भत्त्याचे देयके दोन वर्षांपासून अदा करण्यात न आले नाही ते त्वरित देण्यात यावे. यासाठी आयटकने अनेक वेळोवेळी आंदोलन केली. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. यासंदर्भात महिला व बालविकास विभाग पुणे, विभागीय आयुक्त महिला व बालविकास विभाग अमरावती, मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आदींना प्रत्यक्ष भेट घेऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत माहिती दिली. त्यानंतरही दखल न घेतल्याने आंदोलनाचा पवित्रा घेत प्रलंबित असलेल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी अंगणवाडी सेविकांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले. दरम्यान बी. के. जाधव यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल भंडारी आणि महिला बालविकास अधिकारी कैलास घोडके यांना निवेदन दिले. याबाबत योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाला दिले. या आंदोलनात अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) चे अध्यक्ष बि.के. जाधव, अरूणा देशमुख, मिरा कैथवास, रत्नमाला ब्राह्मणे, सुमित्रा हिवराळे, प्रमिला राव, प्रमिला भांबुरकर, आशा टेहरे, माधुरी देशमुख, नाझिमा काजी, माया पिसाळकर, शोभा लामखेडे तसेच जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी सेविकांचा समावेश होता. (प्रतिनिधी)
मानधनासाठी अंगणवाडी सेविकांचे रस्त्यावर आंदोलन
By admin | Published: October 18, 2014 12:49 AM