परतवाडा : फिनले मिलमधील महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून अचलपूर पोलिसांनी तेथील एका अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. याच प्रकरणात अन्य तीन अधिकाऱ्यांनी अटकपूर्व जामिनासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
अचलपूर येथील ४४ वर्षीय महिला कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून अचलपूर पोलिसांनी फिनले मिलचा सहायक व्यवस्थापक नरेंद्र कुमार (३७, रा. गंगसरी, रायबरेली, उत्तर प्रदेश, हल्ली मुक्काम देवमाळी, परतवाडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २८ ऑगस्ट २०१७ ते २३ एप्रिल २०२१ दरम्यानची दाखविण्यात आली आहे. फिर्यादी महिला कर्मचाऱ्याचे कामाचे ठिकाण फिनले मिल असून, घटनास्थळदेखील तेच आहे. संबंधित अधिकारी या महिला कर्मचाऱ्यास तिच्या शिक्षणाच्या तुलनेत कमी दर्जाचे काम द्यायचा. तिला तो मानसिक त्रास द्यायचा. कंपनीत एकटे पाडून तिच्याकडे वाईट नजरेने बघायचा. मनात लज्जा निर्माण होईल, असे वागायचा. लगट करण्याचा प्रयत्न करायचा. याबाबत मिलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. पण, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. कामाच्या जागी तिची पिळवणूक केली, असे पोलिसांकडे दिलेल्या लेखी रिपोर्टमध्ये त्या तक्रादार महिला कर्मचाऱ्याने म्हटले आहे.
धाबे दणाणले
दाखल गुन्हा व तपासाच्या अनुषंगाने फिनले मिलमधील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. त्यांनी आपल्या अटकपूर्व जामिनाकरिता हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, या तीनही अधिकाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. पण, त्यांची नावे मात्र कामगार वर्तुळात चर्चिली जात आहेत. हा एक तपासाचा भाग आहे. तपासाअंती जे जे निष्पन्न होईल, त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.