अमरावती : राष्ट्रसंतांच्या कर्मभूमीत पाणीटंचाईची समस्या भीषण झाली आहे. पाण्यासाठी दाहीदिशा भटकंतीची वेळ आल्याने ग्रामस्थांनी शुक्रवारी मोझरी ग्रामपंचायत प्रशासनास धारेवर धरले. सरपंच व ग्रामसचिवांना जाब विचारला. खडाजंगीही झाली. मात्र, आश्वासनाशिवाय ग्रामस्थांच्या हाती काहीही लागले नाही.
अनियमित पाणीपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गुरुवारी मतदानाच्या रात्री सरपंचाच्या घरी धाव घेतली. लोकांच्या भावना तीव्र असल्याने अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले. आश्वासनानुसार सरपंचांनी शुक्रवारी ग्रामपंचायतची बैठक बोलावली. येथे सुमारे ६०० ग्रामस्थ दाखल झाले. ग्रामसेवक उशिरा आल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन ग्रामस्थांना शांत केले. नंतर नियोजित सभा सुरू झाली.
जि.प. सदस्य गौरी देशमुख, लढा संघटनेचे संजय देशमुख, पं.स. सदस्य रंजना पोजगे, सरपंच विद्या बोडखे, उपसरपंच संजय पाटणकर, ग्रामसेवक विनोद कांबळे, पोलीस पाटील शुभांगी फलके व समस्त सदस्य, पाणीपुरवठा कर्मचारी ग्रामपंचायतीच्या सभेला उपस्थित होते. यावेळी टंचाईग्रस्त नागरिकांनी आक्रमकपणे समस्या मांडल्या. ग्रामपंचायतकडून पाणीटंचाईबाबत एक पत्रही प्राप्त झाले नसल्याची बाब जि.प. सदस्य गौरी देशमुख यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिली. त्यावर महिलांनी सरपंच व ग्रामसेवकांवर प्रश्नांची सरबत्ती झाली. सचिव मुख्यालयी राहत नसल्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. त्याबरोबर त्यांच्या कार्यालयीन उपस्थितबाबत आक्षेप घेण्यात आला.
मोझरी ग्रामपंचायतने अधिग्रहित केलेल्या दोन्ही विहिरी शेतात आहेत. तेथील वीजपुरवठा आठ तास आहे. त्यामुळे अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यास अडसर निर्माण झाला. महावितरणकडे याबाबत पाठपुरावा केला असून, वीजपुरवठा आठ तासांपेक्षा अधिक झाल्यास गावात तीन ते चार दिवसांआड पाणीपुरवठा करणे शक्य होईल, असे ग्रामसेवक कांबळे यांनी सांगितले. ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकाºयांची शनिवारी पुन्हा बैठक बोलावली आहे.
मोझरी विकास आराखड्यातून अंदाजे एक कोटी रुपये खर्चून संपूर्ण गावात पाणीपुरवठ्यासाठी पाइप लाइन नव्याने टाकण्यात आली. ती सदोष आहे. गावातील ८४४ नळ दोन टाकीवर विभागून देण्यात आले आहेत. पाणीसमस्येवर तातडीने तोडगा काढू.- विनोद कांबळे, ग्रामसेवक, मोझरी
पाणीप्रश्नाबाबत दररोज शेकडो महिला-पुरुष माझ्या घरावर हल्लाबोल करतात. असभ्य भाषेत रोष व्यक्त करतात. त्यांच्या भावना समजू शकते. पण महावितरणकडून विलंब होत आहे. येत्या काही दिवसांत यावर तोडगा काढू.- विद्या बोडखे, सरपंच, मोझरी