जनतेच्या पैशांवर सरकार आपल्या दारी अन् थापा मारतंय लय भारी, अशी परिस्थिती सध्या आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील हिंगोलीतल्या निर्धार सभेत केली. शेतकऱ्यांना व ग्राहकांनाही योग्य भाव मिळवून देणे सरकारचे काम. मात्र, सरकारने कांदा उत्पादकांना छळले. तीच गत इतर मालांचीही आहे, असा दावा उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.
चांगले नेते तयार करण्याची ताकद भाजपामध्ये नाही. त्यांना नेते, कार्यकर्ते चोरावे लागतात. दिल्लीच्या वडिलांची किंमत राहिली नाही म्हणून माझे वडील चोरावे लागतात. इतर पक्षांतून नेते मागविणार असाल तर ही नामर्दानगी आहे, अशी जहरी टीका देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी केली. उद्धव ठाकरेंच्या या टीकेनंतर राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. याचदरम्यान, उद्धव ठाकरेंचे भाषण ऐकून वाईट वाटलं, असं वक्तव्य भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांनी केलं आहे.
अनिल बोंडे म्हणाले की, उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण पेलवला नाही आणि सांभाळताही आला नाही. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. उद्धव ठाकरे सध्या सोनिया गांधींच्या विचारावर बोलतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी धनुष्यबाण जपला. सध्याचे सरकार गोरगरिबांच्या घरी जाऊन योजना देता येतं. उद्धव ठाकरे कधी घराबाहेर पडले नाहीत. ठाकरेंनी ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून सरकार चालवलं. त्यामुळे त्यांना त्याची किंमत कशी कळणार?, असा सवालही अनिल बोंडे यांनी उपस्थित केला आहे. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा देशासाठी काम करावं लागतं. त्यानंतर पक्षासाठी काम करावं लागतं, असा खोचक टोला देखील भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.
उद्धव ठाकरेंनी काल वेड्यांची जत्रा भरवलेली-
काल हिंगोलीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. यावेळी ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. या टीकेला आता शिंदे गटाकडून प्रत्युत्तर येत आहेत. आमदार संतोष बांगर यांनीही प्रत्युत्तर दिले. संतोष बांगर म्हणाले, जमा केलेली लोक एकनिष्ठ नाहीत. जिल्हा प्रमुखांनी अनेक पक्ष बदलली आहेत. उद्धव ठाकरेंनी काल वेड्यांची जत्रा गोळा केली होती. या लोकांच्यामुळे आमच्या शिवसेनेवर काहीही फरक पडणार नाही, असं प्रत्युत्तर आमदार बांगर यांनी दिलं.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी कायम राहतील-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम राज्यातील जनता पाहत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी कायम राहतील. आम्ही सत्तेत राष्ट्रवादीसोबत बसलो. पण राष्ट्रवादी स्वतः या सत्तेत सहभागी झाली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व मान्य केले, उद्धव ठाकरेंनी आमच्या कावड यात्रेतील गर्दी पहावी. त्यानंतर आपल्या छातीवर हात ठेवून ही ताकद कुणाची हे सांगावे, असं आवाहनही बांगर यांनी केलं.