अमरावती : शहरातील राजापेठ उड्डाणपुलावरून शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्यानंतर शहरात तणाव निर्माण झाला आहे. यावरुन नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा सधला आहे.
पुतळा हटविल्यामुळे युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते प्रचंड संतापले आहेत. खासदार नवनीत राणादेखील चांगल्याच आक्रमक झाल्या असून त्यांनी कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्री मुर्दाबाद, जय भवानी जय शिवाजी असे नारेही लावले. लोकप्रतिनिधींना महाराजांच्या पुतळ्यासाठी भांडावं लागतयं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा आणि आदर्शांचा विसर पडलाय का? अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पुतळा हटविल्यानंतर, संतप्त कार्यकर्त्यांनी राणा दाम्पत्याच्या घरासमोर मोठी गर्दी केली. कार्यकर्ते मात्र जोराजोरात घोषणाबाजी करत होते. घोषणाबाजी करणाऱ्या काही महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पुतळा हटवण्याच्या घटनेचा निषेध करताना खासदार नवनीत राणा म्हणाल्या, "सदर ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवावा, म्हणून तीन वर्षांपासून परवानगी मागण्यात येत होती. पण वेळोवेळी प्रशासनाने ती परवानगी नाकारली."
पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रशासनावर दबाव आणल्याचा आरोप
जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी पुतळा हटवण्यासाठी प्रशासनावर दबाव आणल्याचा आरोप युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. तर, त्यांना निवडणुकीत शिवप्रेमी जागा दाखवून देईल, असा इशारा खासदार नवनीत राणा यांनी दिला.
महापालिका आयुक्तांच्या पुतळ्याचे दहन
राजापेठ उड्डाण पुलावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्याच्या कार्यवाहीचा निषेध म्हणून स्वराज्य सामाजिक संघटनेच्यावतीने स्थानिक ईर्विन चौकात महापालिका आयुक्तांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी महापालिका प्रशासनाविरूद्ध जोरदार नारेबाजी करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी अमोल ईंगळे यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
महापालिकेला विशेष सभा घेण्याची केली होती मागणी
राजापेठ उड्डाणपुलावर शिवाजी महाराजांचा पुतळा विनापरवानगी बसविण्यात आला होता. तीन वर्षांपासून तेथे शिवछत्रपतींचा पुतळा बसवण्यात यावा, अशी मागणी होती. ही मागणी शिवप्रेमी व तरुण कार्यकर्त्यांनी पूर्ण केली असा दावा आमदार रवी राणा यांनी केला होता. गेल्या तीन दिवसांपासून तेथे शहरातील शिवप्रेमींनी मोठी उपस्थिती लावली होती. तो पुतळा कायमस्वरूपी तेथेच ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या बहाल करण्याची मागणी आमदार राणा यांनी महापालिका प्रशासनाकडे केली होती.
दरम्यान, १२ जानेवारीला राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राजापेठ उड्डाणपुलावर आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला होता. मात्र, यासाठी कोणतीच परवानगी न घेतल्यामुळे हा पुतळा अनधिकृतरित्या बसवण्यात आल्याचं कारण सांगत पोलिसांनी पहाटे हटवला. त्यानंतर राणा दाम्पत्याच्या घरापुढे कार्यकर्त्यांची गर्दी जमली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना त्यांच्या निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्यांच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.