अमरावती : महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणी आमदार रवी राणा यांच्यासह ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणानंतर खासदार नवनीत राणा ठाकरे सरकारविरुद्ध आक्रमक झाल्या असून आमदार रवी राणा यांना सुडापोटी अडकविण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अमरावती महापालिका आयुक्तांवर झालेल्या शाईफेक प्रकरणानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी खासदार नवनीत ह्या मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांना भेटण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर गेल्या होत्या. मात्र, आजारी असल्याचे कारण देत आयुक्तांनी नवनीत राणा यांची भेट नाकारली. यावेळी आयुक्तांच्या बंगल्यावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तर, लोकप्रतिनिधी म्हणून मी आयुक्तांचे सांत्वन करायला आले होते. शाईफेक प्रकरणी मी त्यांच्याकडून माहिती घेत होती. परंतु त्यांनी माझी भेट न घेऊन माझा नाही तर जनतेचा अवमान केला, अशी प्रतिक्रिया खा. राणा यांनी यावेळी माध्यमांना दिली.
राजापेठ येथे महापालिका आयुक्तांवर करण्यात आलेली शाईफेक अतिशय गंभीर बाब आहे. याचे आम्ही कधीच समर्थन केलेलं नाही. परंतु, यानंतर ज्याप्रकारे आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, यामागे वाईट राजकारण करण्यात येत आहे. राजापेठ येथे सकाळी हा शाईफेक प्रकार घडला मात्र, त्याचा गुन्हा १० तासानंतर रात्री साडे अकरा वाजता दाखल करण्यात आला. मग तब्बल १० तास तुम्ही काय करत होतात? कोणती प्लॅनिंग करत होता? असा सवाल खासदार नवनीत राणा यांनी उपस्थित केला आहे.
ज्या दिवशी हे प्रकरण घडलं त्यादिवशी आमदार रवी राणा हे शहरात उपस्थित नव्हते. परंतु, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी आयुक्तांचं पहिलं बयाण हे 'मी कोणाला ओळखत नाही, कोणी शाई फेकली हे मला माहित नाही फक्त जे व्हिडीओमध्ये दिसत आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा' असं होतं. वरुन आदेश आल्यानंतरच त्यांनी आपलं बयाण नोंदवल्याचा आरोप खा. राणा यांनी केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
अमरावती शहरातील राजापेठ उड्डाणपुलाच्या भुयारी मार्गात सांडपाणी साचत असल्याच्या माहितीवरून पाहणीसाठी आलेले महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर तीन महिलांनी अचानक धाव घेत शाई फेकली. कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या वाहनांचा टायर फोडण्याचा प्रयत्न केला आणि पेचकचने त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्नदेखील केला. बुधवारी दुपारी १ च्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी आयुक्तांच्या तक्रारीवरून पोलिसांनी १० जणांविरुद्ध गुन्हे नोंदविले. याप्रकरणी आमदार रवी राणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला.