अमरावती : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दाम्पत्य सतत चर्चेत असतात. मग राजकारण, समाजकारण असो वा कोणताही प्रसंग असो. हे जोडपं काही हटकेच असते. असाच प्रसंग मंगळवारी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने अनुभवता आला. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा हे दोघेही वेगवेगळ्या वाहनांनी येथील एका कॉफी शॉपमध्ये आले. एकमेकांना गुलाबपुष्प देत प्रेम व्यक्त केले आणि कॉफी घेऊन व्हॅलेंटाईन डे साजरा केला.
आमदार- खासदार राणा दाम्पत्यांनी ‘गंगा सावित्री’ या त्यांच्या निवासस्थानी मंगळवारी व्हॅलेंटाईन डेनिमित्त सकाळी आई-वडिलांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर शहरातील विविध मंदिरात जावून पूजाअर्चा करून दर्शन केले. राणा दामप्त्य हे पूर्णवेळ राजकारणात असल्याने सतत व्यस्तता, लोकांचा गराडा, भेटीगाठीमुळे ते एकमेकांन अथवा मुलांना वेळ देवू शकत नाही. असे असले तरी आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून आमदार रवी राणा यांनी अचानक खासदार नवनीत राणा यांना शहरातील कॉफी शॉपमध्ये बोलावून सुखद धक्का दिला. संस्कृतीचे जतन होईल अशा पद्धतीने राणा दाम्पत्यांनी अनोख्या पद्धतीने व्हॅलेंटाईन डे साजरा केला.
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, प्रेम हे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असत. केवळ एक दिवस व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यापेक्षा वर्षातील ३६५ दिवस आपल्या संपर्कातील प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या भावना जोपासून प्रेमाने वागणे हाच खरा व्हॅलेंटाईन डेचा अर्थ व तीच आपली संस्कृती असल्याचे आमदार रवी राणा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
एका मंदिरात महाप्रसाद सुरू असताना स्वयंपाक करणाऱ्या भाविक महिलांसोबत पंगतीत भोजन करून त्यांचा आनंद द्विगुणित केला. लोकप्रतिनिधी असून आम्हाला जबाबदारीचे भान असून पती-पत्नी म्हणून आम्ही एकमेकांना सातत्याने समजून घेतो. एकमेकांचा आत्मसन्मान जोपासून आम्ही कर्तव्य पार पाडतो. प्रेम हे निखळ, निर्व्याज व आत्मिक असावे. आजच्या तरुण तरुणींनी प्रेम करताना मर्यादांचे भान व कौटुंबिक जबाबदारीचे भान ठेवून आपले प्रेम हे चेष्टेचा विषय न होता आदर्श व्हावे, यासाठी एकमेकांना शेवटपर्यंत सांभाळण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन खासदार नवनीत राणा यांनी केले.