अमरावती : आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी मेळघाटात आदिवासींसमवेत तीन दिवस मुक्कामी राहून होळी साजरी केली. हा अभिनव उपक्रम राणा दाम्पत्य गत १२ वर्षांपासून अविरत करीत आहे. होळीनिमित्त आदिवासींची संस्कृती, बोलीभाषा, नृत्य आणि होळी पूजनाची पारंपरिक पद्धत, त्यांच्या समस्या, प्रश्नांची माहिती राणा दाम्पत्य जाणून घेतात.
खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी मेळघाटात होळीचे औचित्य साधून ठिकठिकाणी होळीपूजन केले. दरम्यान, फगवा वाटप करून आदिवासी समाजाच्या संस्कृतीचे जतन करण्यात सहभाग नोंदविला. आदिवासी नृत्यात सहभागी होऊन पारंपरिक ढोलकी वादन करण्याचा मोहदेखील राणा दाम्पत्याला आवरला नाही. रवी राणा यांनी यावेळी ढोलकी वाजवली तर नवनीत राणा यांनी आदिवासी नृत्यावर ठेका धरला.
आदिवासी युवकांसोबत व्हॉलीबॉल खेळून राणा दाम्पत्यांनी मने जिंकली. ‘मेळघाट की बेटी खासदार है, होली त्यौहार बहारदार है’ म्हणत आदिवासींनी महिला, पुरुषांनी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
होलिकोत्सवाच्या पहिल्या दिवशी राणा दाम्पत्याने धारणी तालुक्यातील वाऱ्या, टेंभरू, सोनाबर्डी, रत्नापूर, मोखा, चिंचघाट, गोंडवाडी, कुसुमकोट, मांडवा, जुटपाणी, बीजुधावडी, गडगामालूर, भांडूम, ढाकणा, हरिसाल आदी गावांना भेटी देऊन गावोगावी होळीपूजन केले. त्यानंतर आदिवासींना फगवा वाटप करण्यात आले.
युवकांना व्हॉलीबॉल किटचे वाटप
होळीच्या पर्वावर मेळघाटात आमदार रवी राणा व खासदार नवनीत रवी राणा यांच्यातर्फे एक हजार व्हॉलीबॉल किटचे वाटप करण्यात आले. पारंपरिक पद्धतीने आदिवासींच्या होळी उत्सवात सामील होऊन त्यांचा आनंद द्धिगुणीत केला. त्यामुळे आदिवासींच्या उत्साहाला उधाण आले आहे.