अमरावती : सध्या भोंग्याचा वाद राज्यभर पेटलाय. यात राणा दाम्पत्याने उडी टाकल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर शिवसैनिक जमले असून खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. तर, राणा दाम्पत्यानेही शिवसैनिकांना आक्रमक होण्यापेक्षा मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याचा सल्ला दिलाय. यामुळे, राज्याला लागलेली साडेसाती आणि संकट दूर होईल, असे आमदार रवी राणा म्हणाले आहेत.
आज अमरावती येथील हनुमान मंदिरात खासदार नवनीत राणा, आमदार रवि राणा यांनी हनुमान चालिसा पठण केले. पूजा, अर्चा केली. यावेळी राणा दाम्पत्याने पुन्हा एकदा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधलाय. रवी राणा म्हणाले, माझ्यासोबत श्रीराम आणि हनुमानाचा आशीर्वाद आहे. त्यामुळे मी मातोश्रीवर आल्यास आपल्याला कोणीही अडवू शकत नाही. महाराष्ट्राच्या भल्यासाठी हनुमान चालिसा वाचणे गरजेचे आहे, असे म्हटले. आज हनुमान जयंती आहे, बाळासाहेबांचे विचार जर तुमच्यात असतील तर, मातोश्रीच्या आत जाऊन मुख्यमंत्र्यांबरोबर हनुमान चालिसा पठण करावं. हिंदूंना नर्वस करू नका. जर त्यांच्यात खरच हिंदूत्व असेल तर मुख्यमंत्री हनुमान चालिसाचं पठण करतील, असंही राणा म्हणाले. आज हनुमान चालिसा पठण करून आम्ही मुख्यमंत्री ठाकरेंना सद्बुद्धी मिळो आणि महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्याची ताकद मिळो अशी प्रार्थना केल्याचे रवी राणा म्हणाले.
यावेळी नवनीत राणा यांनीही शिवसैनिकांवर टीकास्त्र सोडले, संकटमोचक हनुमान आपल्या पाठीशी आहेत. शिवसैनिकांनी तारीख आणि वेळ सांगावी, त्यादिवशी मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा पठण करेन, अशा शब्दात नवनीत राणा यांनी शिवसैनिकांवर टीकास्त्र सोडले आहे. मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे. त्यामुळे या दोघांची ताकद आपल्या पाठीशी असल्याचे नवनीत राणा म्हणाल्या.
काय आहे प्रकरण
अपक्ष आमदार रवी राणा यांनी काल शुक्रवारी मुख्यमंत्र उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर हनुमान जयंतीनिमित्त हनुमान चालिसाचे पठण करावे, असे म्हटले होते. ते करीत नसतील तर आपण स्वत: खासदार नवनीत राणा यांच्यासह ‘मातोश्री’पुढे हनुमान चालिसाचे वाचन करू, असेही ते म्हणाले होते. यानंतर वातावरण चांगलच तापलं आहे. काही दिवसांपूर्वीच नवनीत राणा आणि रवी राणा हे रवीनगरमधील एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. तिथे त्यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या हजारो महिलांसोबत बसून हनुमान चालीसा पठण केलं होतं.
या प्रकरणावरून रवी राणा आणि शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांच्यात शाब्दिक चकमकही पाहायला मिळाली. असल्या आवाहनांना आम्ही विचारत नाही. उद्धव ठाकरेंनी काय वाचावं, काय करावं हे सांगण्याचा त्यांना अधिकार नाही. तुम्ही आमदार आहात, तुम्ही तुमचं काम करा, असं म्हणत पेडणेकर यांनी संताप व्यक्त केला.
शिवसैनिकांचे राण दाम्पत्याच्या घरासमोर आंदोलन
अमरावतीच्या युवासेनेने शुक्रवारी रात्री १०.४५ दरम्यान राणा दाम्पत्याच्या घरासमोर युवासेनेने आक्रमक आंदोलन करत राणा विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्या तसेच लाऊड स्पीकर हनुमान चालिसा वाजवत आंदोलन केले. ३० मिनिटे युवासेनेने राणा यांच्या घरासमोर आंदोलन केले. तर मातोश्रीवर जाण्याचे स्वप्न बघू नका व हिंदुत्व आमच्या रक्तात आहे, अशी प्रतिक्रिया युवासेनेचे सागर देशमुख यांनी यावेळी दिली.