अजित पवारांचे भाषण नाकारले, फडणवीसांना संधी; हा तर महाराष्ट्राचा अपमान, सुप्रिया सुळेंची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2022 05:50 PM2022-06-14T17:50:43+5:302022-06-14T18:44:59+5:30
हा प्रकार गंभीर आणि वेदनादायी असल्याचे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. दरम्यान, केंद्र सरकारच्या धोरणावरही त्यांनी सडकून टीका केली.
अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी असलेल्या मंचावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे भाषण नाकारले जाते. पण, याच मंचावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भाषणाची संधी दिली जाते, ही बाब दुर्दैवी असून, महाराष्ट्राचा अपमान करणारी असल्याची टीका राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी येथे केली.
खासदार सुळे या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असता त्यांनी पत्रपरिषदेतून राजकीय, सामाजिक प्रश्नांवर संवाद साधला. पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र देहू गावात संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी पार पडला. या कार्यक्रमात मंचावर पंतप्रधान मोदी, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे एकत्र उपस्थित होते. मात्र, या सोहळ्यात देवेंद्र फडणवीसांना भाषण करण्याची संधी दिली जाते. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. प्रोटोकॉलनुसार अजित पवारांना भाषणाची संधी मिळणे आवश्यक होती. त्यानुषंगाने उपमुख्यमंत्री कार्यालयातून पंतप्रधान कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात आला. तरीही अजित पवारांचे भाषण नाकारले आणि देवेंद्र फडणवीसांना संधी दिली जाते. हा प्रकार गंभीर आणि वेदनादायी असल्याचे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. दरम्यान, केंद्र सरकारच्या धोरणावरही त्यांनी सडकून टीका केली.
विरोधात बोलताच ईडी, सीबीआय, आयकरच्या धाडी
केंद्र सरकार अथवा भाजपविरोधी बोलल्यास संबंधितांवर ईडी, सीबीआय आयकरच्या धाडी पडतात. या धाडी पडण्यापूर्वीच राज्याच्या भाजपच्या दोन नेत्यांना अगोदरच माहिती होते, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी, संस्थांवर १०९ वेळा ईडीच्या धाडी पाडण्यात आल्यात, हा नवा विक्रम ठरला. नवाब मलिक, अनिल देशमुख हे दोन्ही मंत्री निर्दोष असल्याची पुष्टी खासदार सुळे यांनी दिली.
पत्रपरिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा ठाकरे, सलील देशमुख, वसंत घुईखेडकर, सुनील वऱ्हाडे, प्रशांत डवरे, संगीता ठाकरे आदी उपस्थित होते.