कुलूप तोडून खासदारांनी घेतला जनसंपर्क कार्यालयाचा ताबा; मंत्री चंद्रकांत पाटील यांना सुनावले खडेबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 07:37 AM2024-06-23T07:37:14+5:302024-06-23T07:38:40+5:30
आमदार यशोमती ठाकूरही संतप्त : मंत्री चंद्रकांत पाटील यांना सुनावले खडेबोल
लोकमत न्यूज नेटवर्क, अमरावती : येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील खासदारांच्या कुलूपबंद जनसंपर्क कार्यालयाचा ताबा नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांना १७ दिवसांनंतरही देण्यात न आल्याने शनिवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर खा. वानखडे व आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाला खडेबोल सुनावले आणि लगेच कुलूप फोडून या कार्यालयाचा ताबा घेतला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील शनिवारी जिल्हा दौऱ्यावर आले. खासदार वानखडे व आमदार यशोमती ठाकूर यांनी पालकमंत्र्यांना घटनाक्रम सांगितला. चावी न दिल्याचा मुद्दा पुढे करून दोघांनी कार्यकर्त्यांसह प्रशासनाच्या विरोधात नारेबाजी करून कार्यालयाचे कुलूप फोडले व कार्यालयाचा ताबा घेतला.
काँग्रेसमध्ये अनेक सुसंस्कृत नेते : चंद्रकांत पाटील
विरोधी पक्ष असूनही काँग्रेसची चांगली संस्कृती, अनेक सुसंस्कृत नेते आहेत. मी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्यासह अनेक नेत्यांना जवळून बघितले, अनुभव घेतला. परंतु खा. प्रणिती शिंदे, आ. यशोमती ठाकूर यांच्याबाबत फारच वेगळा अनुभव येत आहे. परवा सोलापुरात आढावा बैठकीला गेलो असता प्रणिती आल्या. मला बैठकीचे निमंत्रण नाही. मी म्हणालो ही बैठक प्रशासकीय आहे. आल्या तर बसा. पण भाजपचे दोन आमदार बैठकीत कसे? बैठकीत दोन-अडीच तास बसल्यानंतर त्या निघून गेल्या, नंतर कार्यकर्त्याच्या बैठकीत गेल्यानंतर मी 'चंपा'च्या बैठकीला गेले होते. माझे वय काय? तुझे वय काय? मी आपली संस्कृती सोडणार नाही. मी म्हणायला गेलो तर तोंडावर पडाल. अगदी तसेच यशोमतीताई ठाकूर यांच्याबाबत आज घडले, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.
दादागिरी खपवणार नाही
महाविकास आघाडीचे खासदार असल्याने शासन-प्रशासनाद्वारा कार्यालय देण्यास टाळाटाळ करीत आहे. खासदार विजयी झाल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र द्यायला तीन तास लावले. ही दादागिरी आम्ही खपवून घेणार नसल्याचे आमदार यशोमती ठाकूर यांनी चंद्रकांत पाटील यांना सांगितले. आता आंदोलन करूनच कार्यालयाचा ताबा घेऊ, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
खा. वानखडे यांचा पाठपुरावा
जिल्हाधिकारी कार्यालयालगत खासदारांसाठी जनसंपर्क कार्यालय आहे. आचारसंहितेच्या काळात जिल्हा प्रशासनाने ते नवनीत राणा यांच्याकडून ताब्यात घेऊन कुलूप लावले होते. बळवंत वानखडे विजयी झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांनी या कार्यालयाची मागणी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे केली.