ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, भगवे झेंडे हातात घेऊन शिवसैनिक थिरकले
अमरावती : खासदार नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी जाहीर होताच शिवसैनिकांनी येथील राजकमल चौकात जोरदार जल्लोष केला. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि हातात भगवे झेंडे घेऊन आंनदोत्सव साजरा करण्यात आला.
राजकमल चौकात अचानक शिवसैनिक एकवटल्याचे लक्षात येताच पोलिसांची गुप्तचर यंत्रणाही कामी लागली. शिवसैनिकांनी हातात झेंडे घेऊन ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष केला. ढोल ताशांचा गजर होत असताना शिवसैनिकांचे आनंदात पाय थिरकले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करून न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करण्यात आले. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा सत्याचा विजय असल्याची भावना शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील खराटे यांनी व्यक्त केली. यावेळी सुनील खराटे, प्रवीण हरमकर, विकास शेळके, प्रकाश तेटू, जयंत वंजारी, सागर ढोके, अक्रम पठाण, याह्याखान पठाण, बब्बूभाई, पंकज चौधरी, दिगंबर मानकर, विनोद खडसे, दिनेश चौधरी आदींनी आनंदोत्सव साजरा केला.