लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : जिल्हा नियाेजन समितीने सन २०१९-२०, २०२०-२१ या दोन वर्षात कोरोना संक्रमण उपाययोजनांसाठी सीएसआर निधीचा मोठा वापर केला आहे. त्याअनुषंगाने कोणकोणत्या शीर्षावर निधी प्राप्त आणि झालेल्या खर्चाचा तपशील खासदार नवनीत राणा यांनी पत्राद्वारे मागितला आहे. जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचे आगमन हाेताच जिल्हा नियोजन समितीने सीएसआर फंडातून उपाययोजना चालविल्या होत्या. त्यानुसार कोणत्या यंत्रणेने किती निधी घेतला आणि कसा खर्च केला, याची तपशीलवार माहिती मागितली आहे. कोरोनाकाळात आरोग्य यंत्रणेला सर्वाधिक सीएसआर निधी देण्यात आला आहे. मात्र, सीएसआर निधीचे ऑडिट नसल्याने आता खासदार नवनीत राणांनी सीएसआर निधीचा लेखाजोखा मागितल्याने अनेक बड्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. शीर्षनिहाय झालेला खर्च आणि प्राप्त निधीची माहिती खासदारांनी मागितल्याने यंत्रणेत काही तरी गडबड असल्याचे बोलले जात आहे. मात्र, जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडून आलेल्या निधीचा लेखाजोखा प्राप्त झाल्यानंतरच वास्तव समोर येईल.