अमरावती : येथील ऐतिहासिक सायन्सकोर मैदानात ५ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या सायंटिफिक पार्कची खासदार नवनीत राणा यांनी केली पाहणी केली. सायंटिफिक पार्क हा शहरातील सौंदर्यात भर टाकून, शैक्षणिक गुणवत्ता वाढविणारा ठरेल, असे त्या म्हणाल्या.
शहरातील एकमेव भव्यदिव्य असलेल्या या मैदानात मुलांना खेळण्यासाठी जागा- क्रीडांगण, विविध मेळावे, जाहीर सभा, कृषी प्रदर्शनी, महिला बचतगट प्रदर्शनी आदींसाठी राखीव जागा ठेवून उर्वरित जागेचा विकास करावा, असे खासदार नवनीत राणा यांचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले. मैदान हे मैदानच राहावे. नागरिकांचा कोंडमारा होऊ नये, यासाठी हे मैदान अबाधित राहावे. या ऐतिहासिक वारसाला धक्का लागू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला.
सायंटिफिक पार्कमुळे निश्चितच शहराच्या पर्यटन व शैक्षणिक विकासाला चालना मिळेल. परंतु, शहराचा श्वास असणारे हे मैदान नगरवासीयांच्या क्रीडा, सभा, मेळावे, प्रदर्शनी आदींसाठीसुद्धा उपयोगात यावे. हे मैदान संकुचित होऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त केले. नुसता पार्क उभारून उपयोग नाही, तर त्याचे जतन, संवर्धन व दर्जासुद्धा अबाधित ठेवावा लागणार आहे. त्यासाठी प्रशासनाने कायमस्वरूपी धोरण आखावे, असे निर्देश त्यांनी संबंधिताना दिले.
यावेळी कार्यकारी अभियंता वंजारी, सुनील राणा, जिल्हा परिषद सदस्य दिनेश टेकाम, आशिष कावरे, बंडू डकरे, अजय मोरया, वैभव वानखडे, विनोद गुहे, अभिजित देशमुख, गणेश मारोटकर, पराग चिमोटे, अश्विन ऊके, सद्दाम हुसेन, चंदा लांडे आदी उपस्थित होते.