शहरात ३६ केंद्रांवर परीक्षा, १० हजार ८३७ पैकी ३०६३ परीक्षार्थी गैरहजर, कोरोना नियमांचे काटेकारेपणे पालन
अमरावती : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने रविवारी जीएस आणि सी सॅट अशा दोन प्रकारच्या घेण्यात आलेल्या परीक्षेत एकूण २८.२७ टक्के परीक्षार्थ्यांनी पाठ फिरवली. अमरावती विभागातून एमपीएससी परीक्षेसाठी १०, ८३७ परीक्षार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ३०६३ परीक्षार्थी गैरहजर असल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने केली आहे. सकाळी १० ते १२ वाजता आणि दुपारी ३ ते ५ वाजता अशा दोन सत्रात परीक्षा पार पडली.
अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा व अकोला या पाचही जिल्ह्यांतून ७,७७५ परीक्षार्थ्यांनी एमपीएससीची परीक्षा दिली. ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने अमरावती शहरातील ३६ शाळा, महाविद्यालय असलेल्या केंद्रावर घेण्यात आल्या आहेत. परीक्षार्थींना मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर अशी सुरक्षा किट आयोगाकडून पुरविण्यात आली. परीक्षा सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी समन्वय अधिकारी, उपकेंद्रप्रमुख, पर्यवेक्षक, समवेक्षक, लिपिक, शिपाई असे एकूण १,१०० कर्मचारी, अधिकाऱ्यांनी कर्तव्य बजावले. तर, प्रत्येक परीक्षा केंद्रावर दोन महिला व तीन पुरूष असे पाच पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात होते. केंद्रावर प्रत्येक कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी झाली असून, परीक्षेदरम्यान एकही परीक्षार्थ्यांमध्ये कोरोनाचे लक्षणे आढळून आले नाही, अशी माहिती एमपीएससी परीक्षेचे मुख्य प्रवर्तक तथा निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. आयोगाच्या गाईडलाईनुसार केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याची माहिती विद्याभारतीचे महेंद्रसिंह सिसोदीया यांनी दिली. परीक्षा केंद्रावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना फेशशिल्ड, मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर पुरविण्यात आले.
-------------------
बारकोड, मेटल डिटेक्टर,थर्मल गनद्धारे तपासणी
एमपीएससीच्या प्रत्येक परीक्षार्थ्यांची मेटल डिटेक्टर, थर्मल गनद्धारे तपासणी करण्यात आली. त्याकरिता जिल्हाप्रशासनाने स्वतंत्र कर्मचारी नियुक्त केले होते. परीक्षा हॉल तिकीटवर बारकोड तपासणी झाल्यानंतरच प्रवेश देण्यात आले. ही व्यवस्था ३६ परीक्षा केंद्रावर करण्यात आली होती. दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध केंद्राची पाहणी करून परीक्षेचा आढावा घेतला. कोरोना नियमावलींचे पालन करुन एमपीएससीच्या परीक्षा शांततेत पार पडल्या.
--------------------
सिपना महाविद्यालयात रेल्वे परीक्षा
रविवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा परीक्षा आणि रेल्वे भरती परीक्षा पार पाडली. रेल्वेकडून ‘नाॅन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी’ (एनटीपीसी) ही ऑनलाइन परीक्षादेखील येथील सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयात घेण्यात आली. मध्य रेल्वे भुसावळ विभागामार्फत रेल्वे परीक्षांचे नियोजन करण्यात आले होते, अशी माहिती आहे.
------------------
एमपीएससी परीक्षेसाठी अतिशय चांगली व्यवस्था करण्यात आली होती. कोरोना संसर्गाबाबतची दक्षता घेण्यात आली. पेपर थाेडा सुलभ होता.
- मंजश्री धांडे, परीक्षार्थी, अमरावती.
--------
एमपीएससीचे जीएस आणि सी-सॅट असे दोन्ही पेपर चांगल्या पद्धतीचे होते. नियमित स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे परीक्षार्थी हमखास उत्तीर्ण होतील. परीक्षेसाठी असलेली व्यवस्था उत्तम प्रकाराची होती.
- भाग्यलक्ष्मी दगडमवार, परीक्षार्थी, यवतमाळ