अमरावती : एमपीएसीसीची राज्य सेवा पूर्वपरीक्षा रविवार, २१ मार्च रोजी आटोपली. आता शनिवार, २७ मार्च रोजी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा अमरावती शहरात १४ उपकेंद्रांवर होणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने तयारी चालविली आहे.
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० ही शनिवारी सकाळी १०.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत एका सत्रात होणार आहे. या परीक्षेसाठी अमरावती विभागातून ४३१२ परीक्षार्थी असणार आहेत. अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ अशा पाचही जिल्ह्यांतून एकूण ४३१२ परीक्षार्थी ही परीक्षा देणार आहेत. उमेदवारांना मास्क, ग्लोव्हज व सॅनिटायझर पाऊच आयोगामार्फत पुरविले जाणार आहे. परीक्षा केंद्रावर कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचारी यांना फेसशिल्ड, मास्क, ग्लोव्हज व सौनिटायझर पाऊच आयोगामार्फत पुरविले जाणार आहे.
----------------
अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी
शनिवारी होऊ घातलेल्या एमपीएससी अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेच्या अनुषंगाने केंद्रावर नियुक्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. येथील बचत भवनात गत दोन दिवसांपासून ही चाचणी होत आहे. एकंदरित ६०० कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी झाली असून, कोरोना संक्रमित आढळून येणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार नाही, अशी माहिती आहे.
------------------------
असे राहतील केंदावर कर्मचारी
- समन्वय अधिकारी- ४
- भरारी पथक प्रमुख- १
- केंद्रप्रमुख - १४
- पर्यवेक्षक - ५७
-समवेक्षक- २००
- लिपिक - २८
- शिपाई - २८
---------------------
अमरावती शहरातील १४ शाळा, महाविद्यालयांत एमपीएससीची अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा शनिवारी होणार आहे. त्याकरिता कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. या परीक्षेच्या अनुषंगाने तयारी पूर्ण झाली आहे. केंद्रांची पाहणीदेखील केली आहे.
- नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी, अमरावती