ब्राम्हणवाडा थडी मंडळात दमदार पाऊस;
ईतर सहा मंडळात साधारण पाऊस
चांदूर बाजार - स्थानिक महसूल विभागाकडून साधारणतः १ जूनपासून मान्सूनपूर्व व मान्सूनच्या पावसाची महसूल मंडळनिहाय रितसर नोंद घेतली जाते. त्यानुसार यावर्षीचा पहिला पाऊस ८ जूनला रात्री ८.३० ते १०.३० या वेळेत तालुक्यात बरसला. मृगधारांनी धरणीमातेला भिजविले. हा आनंददायी सोहळा तालुक्यातील नागरिकांनी अनुभवला.
महसूल विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील सात महसूल मंडळांपैकी सहा महसूल मंडळांमध्ये सरासरी १७.०३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच तारखेपर्यंत तालुक्यात ३८.७५ मिमी एवढा पाऊस झाला होता. तालुक्यात मंगळवारी ब्राम्हणवाडा थडी मंडळात दमदार पाऊस झाला.या मंडळात सर्वाधिक ३५ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. या मंडळातील काही गावांमध्ये रात्री पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. परंतु, हा पहिलाच पाऊस असल्यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही. चांदूर बाजार मंडळात १८.०१ मिमी, आसेगाव मंडळात २२.२० मिमी, करजगांव म़ंडळात १२ मिमी, शिरजगाव कसबा मंडळात १५ मिमी, बेलोरा मंडळात १७.०४ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. तळेगाव मोहना या मंडळात पाऊस निरंक आहे.