अमरावती : आरएफओ दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेला उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला पोलिसांनी अटक केली. त्याला पाठीशी घालणारा अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रसंचालक एम.एस. रेड्डी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून तातडीने अटक करावी व दीपाली चव्हाण यांच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, या मागणीसाठी खासदार नवनीत राणा व आमदार रवि राणा यांनी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिणा यांची शनिवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास भेट घेतली. त्यांच्याशी या प्रकरणावर अर्धा तास चर्चा केली. जिल्हाभरातून आलेले युवा स्वाभिमान संघटनेचे महिला व पुरुष पदाधिकारीसुद्धा यावेळी उपस्थित होते.
दीपाली चव्हाण यांचे प्रकरण गंभीर आहे. शिवकुमारने दीपाली चव्हाण त्यांचा नोकरीत असताना छळ केला. त्यांना मानसिक त्रास दिला. ही बाब तिने अनेकदा एम.एस. रेड्डीला सांगितली. मात्र, शिवकुमारविरुद्ध कारवाई करण्याऐवजी त्याला पाठीशी घातले. म्हणूनच त्याची हिंमत वाढली. दीपाली यांना हा प्रकार सहन न झाल्याने तिने टोकाची भूमिका घेतली. या प्रकरणात जेवढा दोषी शिवकुमार आहे, तेवढाच रेड्डीसुद्धा आहे. त्यामुळे त्याला आरोपी करून अटक करण्याची आवश्यकता असल्याचे खासदार नवनीत राणा व आमदार रवि राणा यांनी आयजींना सांगितले. त्यावर बोलताना विशेष पोेलीस महनिरीक्षक चंद्रकिशोर मिणा म्हणाले की, शिवकुमारला अटक झाली आहे. त्याला २९ मार्चपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडीसुद्धा मिळाली आहे. कोठडीदरम्यान याप्रकरणी कोण-कोण दोषी आहे व कुणाचा किती सहभाग आहे, ही बाब पुढे येईलच. तपासादरम्यान जे काही पुरावे हाती लागतील, त्यानंतर यात कितीही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असेल, त्यांच्यावर पोलीस कायदेशीर कारवाई करतीलच, असे आयजींनी खासदार नवनीत राणा व आमदार राणा यांना सांगितले. पोलीस उपविभागीय अधिकारी दर्जाचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करीत असल्याचे आयजींनी स्पष्ट केले.