अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी, उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याचेवर सदोष मुनष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष निशा शेंडे यांनी पत्रपरिषदेतून केली आहे.
दीपाली या गुणी आणि कर्तबगार अधिकारी होत्या. मात्र, त्यांना गर्भार अवस्थेत सलग तीन दिवस जंगलात राऊंडसाठी पायी फिरायला लावण्यास विनोद बाला याने भाग पाडले. परिणामी गर्भपात झाला. त्यानंतरही दीपालीा यांचा सुटीचा अर्ज केल्यावर तिची सुटी नामंजूर करण्यात आली. दीपाली यांना गावकरी, कर्मचाऱ्यांसमोर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे, रात्री-अपरात्री कार्यालयीन कामाच्या नावाने घरी बोलावणे अशाप्रकारे त्रास देण्यात आला. विनोद शिवकुमार बालाच्या आर्थिक, मानसिक त्रासाचा उल्लेख दीपाली यांनी सुसाईड नोटमध्ये नमूद केला आहे. ॲट्राॅसिटी दाखल करण्यापर्यंत अधिकाऱ्यांनी मजल गाठली. त्यामुळे एम.एस. रेड्डी, विनोद शिवकुमार बाला या दोघांविरूद्ध भादंविच्या ३०२, ३०५ तसेच विशाखा कायद्यानुसार तात्काळ गुन्हे दाखल करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष विद्या वानखेडे, बडनेरा शहराध्यक्ष पुष्पा बोरकर, सुनीता रामटेके, वैशाली कोटांगळे आदींनी केली आहे.