इंदल चव्हाण/अमरावती : महावितरणने कर्मचा-यांंसाठी ‘डॅशबोर्ड व एम्प्लॉई मित्र’ या मोबाइल अॅपच्या माध्यमातून आॅनलाइन सुविधा उपलब्ध केली. या माध्यमातून दैनंदिन कामकाजात सुलभता येऊन ग्राहकांना प्रभावी सेवा मिळणार आहे. कर्मचा-यांना स्मार्ट बनविण्यामागे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांचे प्रयत्न राहिले आहेत.
डॅशबोर्ड अॅपमध्ये विविध माहिती आॅनलाइन व एकत्रितपणे उपलब्ध होणार आहेत. ग्राहकांची आकडेवारी व यादी, त्यांच्या तक्रारी, दिलेले वीजबिल, ग्राहकांनी केलेला भरणा, जमा झालेली रक्कम, थकबाकी या सर्वांची माहिती व विश्लेषण महावितरणच्या सर्वच कार्यालयांमध्ये आॅनलाइन उपलब्ध असेल. या प्रणालीमुळे महावितरणची सर्व माहिती अचूक व एकसमान मिळणार आहे. याद्वारे वितरण, वाणिज्यिक हानी, थकबाकी यासह अन्य त्रुटीवर अधिक लक्ष केंद्रीत करता येणार आहे.
मोबाइल अॅपच्या माध्यमातून कर्मचा-यांना सर्व वैयक्तिक सुविधा तर बहुतांश कार्यालयीन कामकाज हाताच्या बोटावर उपलब्ध झाले आहे. दरमहा पगारपत्रक, भविष्य निर्वाह निधीची माहिती, विविध भत्यांसाठी (टीए, डीए) अर्ज व मंजुरी, रजेसाठीचा अर्ज व आॅनलाइन मंजुरी, शिस्तभंग कारवाई प्रलंबित असल्यास तिची स्थिती, सेवाज्येष्ठता यादी, बदलीसाठीचा विनंती अर्ज अशा सर्व वैयक्तिक सुविधा मोबाइल अॅपमधून मिळणार आहे. या अॅपमधून केलेल्या अर्जावर वरिष्ठ अधिका-यांनाही विहित मुदतीत आॅनलाइन कार्यवाही करावी लागणार आहे. या वैयक्तिक सुविधांशिवाय दैनंदिन कामकाजाबाबतच्या वरिष्ठांच्या सूचना किंवा निर्देशही अॅपवरून मिळण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
२५ लाख ग्राहकांद्वारा मोबाइल अॅपचा वापरमहावितरणचे व्यवस्थापकीय संचालकांच्या कल्पनेतून दीड वर्षांपूर्वी ग्राहकांसाठी मोबाइल अॅप लॉन्च करण्यात आले. आतापर्यंत २५ लाख ५८ हजार ग्राहकांनी हे अॅप डाउनलोड केले आहे .कर्मचा-यांंसाठी मोबाइल अॅप व डॅशबोर्ड या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. राज्यभरातील कर्मचा-यांना या सुविधेच्या वापराचे प्रशिक्षण देण्यास येत असल्याचे सांगण्यात आले.