अमरावती : महावितरणचे अमर जाधव यांच्या मार्गदर्शनात ' एकलव्य धनुर्विद्या अकादमी ' नांदगाव खंडेश्वरची विद्यार्थिनी मंजिरी अलोने हिने पोलंड येथे आंतरराष्ट्रीय ' युथ वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशीप स्पर्धे'त वैयक्तिक आणि सांघिक खेळात दोन कांस्य पदक पटकाविल्याबद्दल महावितरणच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांनी तिचा गौरव केला.
९ ते १५ ऑगस्ट २०२१ दरम्यान ही स्पर्धा पोलंड देशात पार पडली. यात सहभागी झालेली 'एकलव्य धनुर्विद्या अकादमी 'नांदगाव खंडेश्वरची विद्यार्थिनी मंजिरी व तिचा प्रशिक्षक म्हणून भारतीय धनुर्विद्या संघात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अमरावती परिमंडळांतर्गत नांदगाव खंडेश्वर उपविभाग येथे उच्चस्तर लिपिक या पदावर कार्यरत असणारे अमर जाधव यांची आर्चेरी असोशिएशन ऑफ इंडियाने निवड केली होती.
अमर जाधव यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण घेतलेल्या मंजिरी अलोने हिने वैयक्तिक आणि सांघिक खेळात उत्तम कामगीरी करत प्रत्येकी एक याप्रमाणे 'युथ वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशीप स्पर्धेत ' ६० मिटर रेंजमध्ये दोन कांस्य पदक मिळवून देत देशाला सन्मान मिळवून दिल्याबद्दल तिचा गौरव करण्यात आला. अधीक्षक अभियंता दीपक देवहाते, सहायक महाव्यवस्थापक रूपेश देशमुख, कार्यकारी अभियंता भारतभूषण औगड, एकलव्य धनुर्विद्या अकादमीचे संस्थापक सदानंद जाधव, श्रीरंग वंजाळकर, रामकृष्ण चिखलकर, विलास मारोटकर यावेळी उपस्थित होते.