अमरावती: दरवर्षी महावितरणकडून मान्सूनपूर्व विद्युत यंत्रणेची देखभाल व दुरुस्तीची कार्य केली जातात, यामध्ये विद्युत यंत्रणेला लागलेल्या झाडाच्या फांद्या काढण्यासह वाहिन्या व यंत्रणेची देखभाल दुरुस्ती यासह नियोजन करून इतर महत्त्वाची कामे केली जातात, असे महावितरणने स्पष्ट केले.
अमरावती परिमंडळात ही कामे गतीने सुरू आहेत. कोव्हीड - १९ च्या विषाणूच्या प्रादुर्भावापासून संरक्षण करण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली असून त्यामध्ये सर्व नागरिक घरी असून, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी फक्त सेवेत आहेत. त्यामुळे कुठलाही वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी या महामारीच्या स्थितीत महावितरणचे कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु विद्युत यंत्रणांच्या देखभाल व दुरुस्तीचे काम करायचे असल्यास सदर कार्य करण्यासाठी त्या भागातील वीजपुरवठा खंडित करावाच लागतोच, त्यामध्ये सर्व भागाचा वीज पुरवठा खंडित न करता टप्प्याटप्प्याने कामे करून तेवढाच भाग खंडित करून त्या भागातील दुरुस्ती कामे केली जातात. ही कामे पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होऊन जास्त वेळ बंद राहू नये म्हणून उंच वाढलेल्या झाडांच्या फांद्या विद्युत यंत्रणेला स्पर्श करीत असेल तर त्या फांद्या तोडणे, फुटलेले पीन आणि इंसुलेटर बदलणे, तपासणी व दुरुस्त करणे, रोहित्रांचे ऑईल तपासणी, ऑइल गळती थांबवणे, वाहिनींचे खराब झालेले लाईटनिंग अरेस्टर बदली करणे, भूमिगत वाहनांचे तात्पुरती असलेले जॉईट कायमस्वरूपी करणे, वाहिन्यांचे खराब झालेले जंपर बदली, जीर्ण झालेल्या वायर बदल, जळालेल्या तुटलेल्या वायर बदल आदी कामे केली जातात.
महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कोव्हीड अनुषंगाने उपाययोजना व सुरक्षितता बाळगून ही कामे योग्य ती काळजी घेऊन गतीने करण्याबाबत निर्देशित केले आहे. त्यानुषंगाने ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा मिळावा म्हणून हे पावसाळ्यामध्ये यंत्रणा ठप्प न होता अखंडित पुरवठा व्हावा आणि त्यामुळे ग्राहकांना या प्रादुर्भावात घरबसल्या योग्य सेवा मिळावी म्हणून ही कामे करत असतात. सोबतच ही कामे करण्याअगोदर ग्राहकांच्या मोबाईलवर एसएमएस द्वारे सुद्धा यासंदर्भात पूर्वसूचना दिली जाते आणि ही कामे योग्य प्रमाणात विभाजन करून त्या प्रकारे एक एक भाग बंद करून ही कामे केली जातात.
बॉक्स
कोरोनाची परिस्थिती बघता या काळात कोविड हॉस्पिटल, ऑक्सिजन प्लॉट, कोविडशी संबंधित सर्व रुग्णालये, केंद्रे यांचा वीजपुरवठा खंडित होणार नाही. याची विशेष दखल घेतली जात आहे.