अमरावती : महावितरण अमरावती परिमंडळाच्या नव्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांनी आपल्या पदाचा कार्यभार यापूर्वीच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांच्याकडून शुक्रवारी स्वीकारला.
ऊर्जा हे विकासाचे मूळ स्रोत असल्याने परिमंडळ अंतर्गत असलेल्या समाजाच्या शेवटच्या घटकांना गतिमान सेवा व ऊर्जेद्वारे विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे, वीजचोरी, वीजगळतीला आळा घालणे, अखंडित, पारदर्शक आणि गतिमान सेवा देण्यावर भर राहणार असल्याचे मत पुष्पा चव्हाण यांनी व्यक्त केले.
मूळच्या अमरावती येथीलच असलेल्या पुष्पा चव्हाण यांनी महावितरणच्या पहिल्या, महिला मुख्य अभियंता म्हणून मुख्य अभियंता (वितरण) या पदावर २०१५ साली नियुक्ती झाली. त्यानंतर मुख्य अभियंता (एकात्मिक ऊर्जा विकास योजना), मुख्य अभियंता भांडुप परिमंडळाची जबाबदारी अत्यंत कुशलतेने आणि यशस्वीरीत्या पार पाडली. भांडुप परिमंडळात मुख्य अभियंतापदी कार्यरत असताना जागतिक वारसा लाभलेल्या घारापुरी बेटास समुद्राच्या तळाच्या १.२ मीटर खालून सात किमी लांबीची २२ केव्हीची उच्च दाब केबल टाकून वीजपुरवठा करण्यात आला. या कामाची जबाबदारी मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांनी अत्यंत यशस्वीपणे पार पाडली. सुचित्रा गुजर यांची मुंबई येथे बदली झाली आहे.