चिखलदरा : तालुक्यातील चिखली येथील ॲक्टिव्ह कोरोनाबाधीतांची संख्या शनिवारी तब्बल ५८ झाली. त्यामुळे गावात खळबळ उडाली आहे. पाच दिवसांपासून कोरोना संक्रमित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य विभागाच्यावतीने शासकीय आश्रमशाळा चिखली येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.
तालुक्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १४६ असून, एकट्या चिखली गावात ५८ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. तालुक्यातील चिखली येथे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा स्फोट झाला. दीड हजार लोकसंख्येच्या गावात नव्वदच्या जवळपास कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली असून शनिवारी ५८ ॲक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाद्वारा देण्यात आली. वाढती संख्या पाहता तेथीलच शासकीय आश्रम शाळेत कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. डॉ. रोहन गीते, डॉ. वंदना मरस्कोल्हे, डॉ.देशमुख, आरोग्य सेविका गुजर, कासदेकर, आरोग्य सेवक मनांग बेठेकर, लखड, धंदर ग्राम पंचायत कर्मचारी काम करीत आहे चिखली येथे धारणीच्या प्रकल्प अधिकारी, मिताली सेठी, चिखलदरा तहसीलदार माया माने, बीडीओ प्रकाश पोळ, तालुका वैद्यकीय अधिकारी सतीश प्रधान, पंचायत समिती उपसभापती अविनाश मेटकर आदींनी कोविड संदर्भात आदिवासींना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रनमाळे यांनी शनिवारी परिस्थितीचा आढावा घेतला.
कोट
चिखली येथे कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने आश्रम शाळेत कोरोना सेंटर उभारण्यात आले आहे. डॉक्टर व आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आले.
- सतीश प्रधान,
तालुका वैद्यकीय अधिकारी
चिखलदरा