अमरावती : परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा, अकोल्याचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षकांची छायाचित्रे व्हॉट्सॲप डीपीवर ठेवून ते क्रमांक त्यांचेच असल्याची भलामण करत खंडणी उकळणारा पत्रकार मुकुंद कोरडे हा गुन्हा दाखल होताच अकोट शहरातून पसार झाला आहे. सोमवारी रात्री आठच्या सुमारास गुन्हा दाखल होताच एक पोलीस पथक त्याच्या घरी पाठविण्यात आले. मात्र, तो पोलिसांच्या हाती लागला नाही. दरम्यान, या खंडणी प्रकरणाची चौकशी अकोल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी दुधगावकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
हिवरखेडचे तत्कालीन ठाणेदार मनोज लांडगे यांच्या तक्रारीवरून सोमवारी रात्री अकोट शहर पोलिसांनी आरोपी पत्रकार मुकुंद कोरडे या खंडणीखोरांविरुद्ध भादंविचे कलम ३८४, ३८५, ४१९ व आयटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल केला. गोवंश प्रकरणात शिक्षा होऊ द्यायची नसेल किंवा हिवरखेडहून बदली टाळायची असेल, तर वरिष्ठांना काहीतरी रक्कम द्यावी लागेल, असे आरोपीने सुचविले होते. एसपी व एएसपींशी आपले तसे बोलणे झाल्याचे त्याने भासविले. आपण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत, हे दाखविण्यासाठी आरोपीने ३० एप्रिल व २ मे रोजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सॲप चॅटचे स्क्रिन शॉटदेखील पाठविले होते. त्याप्रकरणी शहरात असणारा मुकुंद कोरडे सोमवारी रात्री शहरातून पसार झाला. विशेष म्हणजे मुकुंद कोरडे हा अकोला येथील जात पडताळणी कार्यालयात कार्यरत पोलीस निरीक्षक शुभांगी दिवेकर यांचा पती आहे.
पोलिसांना मज्जाव?
गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमवारी रात्री अकोट शहर पोलिसांचे डीबी पथक गोकुळ कॉलनीमधील आरोपी मुकुंद कोरडे याच्या निवासस्थानी त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले होते. परंतु, तेथे पोलिसांना मज्जाव करण्यात आला. आडकाठी निर्माण करण्यात आली. त्यामुळे पोलीस तेथून रिकाम्या हाती परतले. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा १३ जून रोजी अकोट शहर पोलीस ठाण्यात आले होते. त्यावेळी खंडणीखोर कोरडे याला पोलीस ठाण्यात पाचारण करण्यात आले होते. तो हजर झाल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. प्रकरणाची चौकशी एसडीपीओंकडे दिली. त्यानंतर सोमवारी रात्री गुन्हा दाखल होईपर्यंत कोरडे हा शहरातच होता. शिवाय तो अनेक पोलिसांच्या संपर्कात देखील होता. मात्र, त्यानंतर तो पसार झाला.
सोमवारी रात्री गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना करण्यात आले. तो घरी आढळून आला नाही. या प्रकरणाचा तपास एसपींच्या आदेशाने अकोला एसडीपीओंकडे सोपविण्यात आला आहे.
- प्रकाश अहिरे, ठाणेदार, अकोट शहर ठाणे