लोकमत न्यूज नेटवर्क दर्यापूर (अमरावती) : स्थानिक वसंतनगर परिसरातील वृंदावन कॉलनीत एका घरात अनेक दिवसांपासून भाड्याने राहत असलेल्या १३ युवकांना मुंबई पोलिसांनी बुधवारी दुपारी १ वाजता अचानक धाड टाकून ताब्यात घेतले. या आकस्मिक कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.
पोलिसांची दोन वाहने अचानक दाखल झाल्याने परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. यावेळेस पोलिसांनी युवक राहत असलेल्या घरात घुसून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चारचाकी वाहन, अनेक मोबाइल, लॅपटॉप, इतर साहित्य सुद्धा जप्त केले. नेमके प्रकरण काय, याची मुंबई पोलिसांना विचारपूस केली असता, त्यांनी याबाबत माहिती देण्यास नकार दिला. परंतु, हे प्रकरण क्रिप्टो करन्सी ऑनलाइन फ्रॉडचे असल्याचे दर्यापूर पोलिसांकडून सांगण्यात आले.
परिसरातील नागरिकही अनभिज्ञ वरळी (मुंबई) च्या ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात दाखल प्रकरणावरून मुंबई येथील तपास पथक दर्यापुरात दाखल झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने युवकांचे मोबाइल लोकेशन शोधून त्यांनी वृंदावन कॉलनीतील बंडू पवार यांचे घर गाठले. त्यांच्या घरी सात ते आठ तरुण मुले भाड्याने राहत असल्याची माहिती नागरिकांना होती. तथापि, येथे वेगवेगळ्या चार खोल्यांमध्ये १८ ते २२ वर्षे वयोगटातील एकूण १३ युवक आढळून आले.
४२ मोबाइल जप्त युवकांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याजवळ एकूण ४२ मोबाइल, एक कार व दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
मुख्य आरोपी पुण्याचा ताब्यात घेतलेल्या युवकांना वर्क फ्रॉम होमचे आमिष देण्यात आले होते. तुम्हाला क्रिप्टो करन्सीवर लक्ष ठेवून ओटीपी जनरेट करून मिळाल्यावर ती शेअर करायची आहे, असे मुख्य आरोपीने सांगितले होते. तो पुण्याचा असल्याचे सांगितले जात आहे.