कोरोना चाचणीमुळे प्रवासी संख्या घटली, तिरुपती, चैन्नई मार्गावर प्रवाशांची नापसंती
अमरावती : कोरोना संक्रमित रुग्णसंख्येसाठी महाराष्ट्र हॉट स्पॉट झाला आहे. अशातच कोरोना चाचणीशिवाय रेल्वे प्रवास नाही, असे बंधन रेल्वे प्रशासनाने लादले आहे. मुंबई, पुणेसाठी रेल्वे गाड्यांत आरक्षण नाही, असे नेहमीचे चित्र असताना कोरोना काळात एप्रिल महिन्यात आरक्षण उपलब्ध आहे. मात्र, लांबपल्ल्याच्या हावडा, दिल्ली, अहमदाबाद मार्गे ये-जा करण्यासाठी ‘नो रूम’ असे आरक्षण खिडक्यांवर झळकत आहे. हल्ली फेस्टिवल, विशेष रेल्वे गाड्या धावत आहेत.
एरव्ही मार्च, एप्रिल महिन्यात रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण हाऊसफुल्ल असे विदारक चित्र असते. मात्र, यंदा मार्च, एप्रिल या दोन्ही महिन्यात मुंबई, पुणे मार्गावरील रेल्वेत आरक्षण मिळत असल्याचे वास्तव आहे. सध्या अमरावती, बडनेरा रेल्वे स्थानकाहून रोज ६४ गाड्या ये-जा करतात. चैन्नई, तिरुपती या मार्गावर प्रवास करण्यास फारशी पसंती नसल्याचे आरक्षणाच्या आकडेवारीहून दिसून येते. महाराष्ट्राबाहेरील परराज्यातील बहुतांश रेल्वे गाड्यांमध्ये मेपर्यंत आरक्षण हाऊसफुल्ल आहे. अमरावती-मुंबई एक्सप्रेस, गोंदिया- मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर- पुणे एक्सप्रेसमध्ये एप्रिल महिन्यात सहजतेने आरक्षण मिळत आहे. मुंबई, पुणे मार्गावरील रेल्वे गाड्यात वातानुकूलित प्रथम, द्धितीय व तृतीय श्रेणीचे आरक्षण उपलब्ध असल्याचे वास्तव आहे.
-------
रोज ६४ रेल्वे
अमरावती, बङनेरा रेल्वे स्थानकाहून रोज ६४ रेल्वे ये-जा करतात. यात मुंबई, पुणे, अहमदाबाद, चैन्नई, हावडा, पुरी, जयपूर, कोल्हापूर, कुर्ला, विशाखापट्टणम, मालदा, सिकंदरबाद, ओखा, हटिया, जोधपूर, पाेरबंदर, मडगाव आदी मार्गावरील रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.
------------------
मुंबई, पुणे मार्गे आरक्षण, हावडा, दिल्ली नो वेटिंग
नागपूर, अमरावती येथून मुंबई, पुणे या मार्गावर ये-जा करणाऱ्या एकूणच रेल्वे गाड्यात एप्रिलपर्यंत आरक्षण सहजतेने उपलब्ध आहे. मात्र, हावडा, दिल्ली, अहमदाबाद कडे ये-जा करण्यासाठी आरक्षण खिडक्यांवर वेटिंग असल्याचे झळकत आहे. मे महिन्यातही हीच स्थिती राहील, अशी माहिती आहे.
--------------
दहावी, बारावीच्या परीक्षेनंतर रेल्वेत गर्दी
दहावी, बारावीच्या परीक्षा २३ एप्रिलपासून प्रारंभ होत असून, १५ मेपर्यंत या परीक्षा संचालित होणार आहे. त्यानंतर मुंबई, पुणे, कोल्हापूर मार्गे ये-जा करणाऱ्या रेल्वेत गर्दी वाढेल, असे संकेत आहे. कोरोनात बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन होत असून, परीक्षा आटोपताच रेल्वेत प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते. तूर्त एप्रिल महिन्यात आरक्षण उपलब्ध आहे. मे महिन्यात आरक्षणात वाढ होणार आहे.
-------------
कोट
फेस्टिवल, विशेष रेल्वे गाड्या सुरू आहे, आरक्षणाशिवाय प्रवास नाही. त्यातही कोरोना चाचणी बंधनकारक आहे. याचाही फटका रेल्वेला बसला आहे. हल्ली अमरावती, बडनेरा रेल्वे स्थानकाहून रोज ६४ गाड्या सुरू आहेत. मे महिन्यात रेल्वेत गर्दी वाढेल. एप्रिलमध्ये आरक्षण उपलब्ध आहे.
- महेंद्र लोहपुरे, प्रबंधक, अमरावती रेल्वे स्थानक