फुटपाथ गडप : यंत्रणेचे दुर्लक्ष, पादचाऱ्यांना होतोय त्रास अमरावती : महापालिकेने २० ते २५ वर्षांपूर्वी इमारत बांधली. पण, या इमारतीत समोरील भागाकडून चढण्यासाठी रस्त्याचे नियोजन न केल्यामुळे मागील अनेक वर्षांपासून येथे लोखंडी जिणा टाकण्यात आला असून हा जिणा नियमबाह्य आहे. यामुळे फुटपाथ गडप झाला आहे. याकडे महापालिका यंत्रणेने दुर्लक्ष चालविले आहे.राजकमलपासून बडनेराकडे जाणारा मार्ग हा जुना राज्य महामार्ग असून तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली येतो. या रस्त्यालगतच महापलिकेची इमारत असून राजलक्ष्मी टॉकीजसमोरील महापालिकेच्या प्रवेशव्दाराजवळील इमारतीत वरच्या मजल्यावर जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे येथे अनधिकृतपणे दोन लोखंडी जिणा तयार करण्यात आले आहेत. जिण्याखाली लोकांना चालण्यासाठीच फुटपाथ आहेत. पण या जिण्यामुळे फुटपाथवरून नागरिकांना चालता येत नाही. संपूर्ण शहराला महापालिका शिस्त लावते. शहरातील अनेक मोठ्या व्यावसायिकांनी केलेले अनाधिकृत बांधकाम व अतिक्रमण महापालिकेने पाडले आहे. पण, हा अतिक्रमण केलेला अनधिकृत जिणा केव्हा काढणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. महापालिकेने बीओटी तत्वावर ही ईमारत बांधून यातील दुकाने, गाळे अनेक वर्षांसाठी व्यावसायिकांना भाड्याने दिले आहेत. परंतु वरच्या मजल्यावर चढण्यासाठी कुठलीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. हा प्रकार महापालिकेचे अधिकारी मागील अनेक वर्षांपासून उघड्या डोळ्यांनी पाहतात. पण, हा नियमबाह्य जिणा कुणीही काढला नाही. आयुक्त हेमंत पवार हा जिणा काढणार का, असा प्रश्न अमरावतीचे नागरिक विचारत आहेत. (प्रतिनिधी)अतिक्रमण करून व्यवसायिकांनी जिणा बांधला असेल तर मी त्याची तपासणी करतो. अतिक्रमणात असल्यास संबंधित यंत्रणेला ते काढण्यासंदर्भात आदेश देतो. - सु.प.कांबळे, सहसंचालक,नगररचना विभाग, महापालिका
महापालिका इमारतीचा जिणा अतिक्रमणात !
By admin | Published: August 13, 2016 12:07 AM