अमरावती : महापालिका अंतर्गत एकूणच दिव्यांगांचे सर्वेक्षण करून त्यांच्या उत्थानासाठी विकास आराखडा तयार करण्यात यावा तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा, असे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रशासनाला गुरुवारी येथे दिले.
महापालिकेत दिव्यांगांच्या समस्यांबाबत ना. कडू यांनी आढावा घेतला असताना बोलत होते. या आढावा बैठकीला महापौर चेतन गावंडे, आमदार सुलभा खाेङके, महापालिका आयुक्त प्रशांत राेडे, उपायुक्त सुरेश पाटील, रवि पवार, प्रहारचे जिल्हाध्यक्ष चंदू खेडकर, शहराध्यक्ष बंटी रामटेके, दीपक भोंगाडे, राहुल पाटील, अतुल हंबर्डे आदी उपस्थित होते. यावेळी ना. कडू म्हणाले, घरोघरी जाऊन दिव्यांगांची माहिती गोळा करा आणि त्यानंतर विकास आराखडा तयार करावा, याविषयी त्यांनी भर दिला. दिव्यांगाच्या आवश्यकता, गरजा लक्षात घेऊन त्यांना विविध योजनांचा लाभ पोहचवणे, आर्थिक बळ देताना रोजगार देण्यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घेण्याचे ना. कडू म्हणाले. दिव्यांगाचे बचत गट तयार करून जिल्हा उद्योग केंद्रामार्फत त्यांना आर्थिक मदत मिळावी अशा उपाययोजना कराव्यात, असे ते म्हणाले.
------------------
याकडेही वेधले लक्ष
- दिव्यांगांना विनाअट घरकुल मिळावे
- पेन्शन योजना लागू करावी
- मतिमंद, कुष्ठरोगी, वयोवृद्ध दिव्यांगांना वार्षिक पेन्शन नऊ हजार मिळावी
- दिव्यांगांना पाच टक्के निधीतून करारनाम्याचे पैसे द्यावे
- लसीकरणासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी
- दिव्यांग विद्यार्थ्यांना धान्य, वस्तू लाभ वाटप व्हावे