वैभव बाबरेकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्लास्टर आॅफ पॅरीसच्या गणेशमूर्तींवर प्रतिबंध लावण्यासाठी अमरावती महानगरपालिकेने उपविधी तयार केला असून, त्याला महासभेत मंजुरी मिळाली आहे. उपविधी प्रस्ताव शासनदरबारी मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. उपविधीतील नियम व अटीनुसार गणेशमूर्तींच्या निर्मितीची प्रक्रिया ठरणार असल्याने पीओपी मूर्ती महाग होतील, तर मातीच्या मूर्ती स्वस्त होणार आहेत. त्यामुळे या मूर्तींना मागणी वाढून पर्यावरणाचे हितसंवर्धन होईल, असे अपेक्षित आहे.पर्यावरण संवर्धनासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू असून पर्यावरणपूरक गणपती स्थापनेसाठी स्वयंसेवी संस्था पुढाकार घेत आहेत. मातीच्या गणेशमूर्तींच्या स्थापनेकडे नागरिक वळावे, यासाठी स्वयंसेवी संस्थांकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे मात्र याकडे विशेष गंभीर्याने लक्ष नसल्याचे दिसून येते. प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मूर्तींवर पूर्णपणे बंदी नसल्याची बाब पुढे आली असून, उपविधी करण्यात आले आहे.पीओपी नियमित करण्यासंदर्भात उपविधीकडे महापालिकेने पाऊल उचलले. उपविधी हा कायद्यासारखा असतो. महापालिकेने उपविधी तयार केला आहे. त्याला महासभेत मान्यता मिळाली असून, आता हा उपविधी शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला जाणार आहे. त्यानुसार मूर्तिकारांना मूर्ती बनविण्यापूर्वी महापालिकेकडे अर्ज सादर करावा लागणार आहे. त्या अर्जात कोणत्या प्रकारच्या मूर्ती व कशाने बनविणार येणार आहे आणि किती जागेत बनविली जाईल, याची सर्व माहिती अर्जात द्यावी लागणार आहे.उपविधीनुसार गणेशमूर्ती माती व पीओपीची बनविण्याच्या जागेवर वेगवेगळे शुल्क आकारले जाणार आहे. मातीची मूर्ती बनविण्यासाठी जागेनुसार शुल्क अत्यल्प राहणार असून, पीओपी मुर्ती बनविण्याच्या जागेवर अधिक शुल्क आकारले जाणार आहे. हा उपविधी लागू झाल्यानंतर मातीच्या मूर्ती स्वस्त आणि पीओपीच्या मूर्ती नक्कीच महागणार आहेत. मातीच्या मूर्ती स्थापन केल्याचा फायदा पर्यावरणाला व पर्यायाने नागरिकांना सुदृढ जीवनशैलीच्या रूपाने होणार आहे.काय आहे उपविधी?मूर्तिकार ज्या ठिकाणी व्यवसाय करीत आहे, त्या जागेवर कोणत्या प्रकारे मूर्ती तयार केली जाणार आहे, यानुसार शुल्क आकारले जाणार आहे. जर मूर्तिकार मातीच्या मूर्ती तयार करत असतील, त्यांना एक रुपयाने नाममात्र शुल्क आकारण्यात येईल. जर मूर्तिकार पीओपीची मूर्ती तयार करत असतील, तर त्यांना थेट ५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. मूर्तिकार जितक्या चौरस फूट जागेत मूर्ती तयार करतील, त्यानुसार हे शुल्क त्याच्याकडून आकारले जाणार आहे.पीओपीवर बंदी नाही; मात्र उपविधीनुसार कामकाज चालणार आहे. उपविधी कायद्यासारखाच असतो. उपविधीला महासभेची मान्यता मिळाली असून, उपविधी शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला जाणार आहे. उपविधी लागू झाल्यानंतर पीओपीच्या मूर्ती महागतील.- महेश देशमुख, पर्यावरण अधिकारी.
पीओपी गणपती प्रतिबंधासाठी महापालिकेचा उपविधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 9:48 PM
प्लास्टर आॅफ पॅरीसच्या गणेशमूर्तींवर प्रतिबंध लावण्यासाठी अमरावती महानगरपालिकेने उपविधी तयार केला असून, त्याला महासभेत मंजुरी मिळाली आहे. उपविधी प्रस्ताव शासनदरबारी मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे.
ठळक मुद्देमहासभेत मंजुरी : शासनदरबारी सादर करणार