तीन महिन्यांत ४५७ जनावरे बंदिस्त : ११,३४७ श्वानांची नसबंदीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महानगरपालिका परिक्षेत्रात विनापरवानगी जनावरे पाळण्यावर महापालिका प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. जनावरे पाळण्यासाठी महापालिका आयुक्तांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आली आहे. जनावरांना केरकचरा, घाण पदार्थ खाऊ घालण्यावरदेखील निर्बंध लावण्यात आले आहे.महानगरपालिका सभागृहात बुधवारी मोकाट श्वान, भटक्या व उपद्रवी वराह, मोकाट जनावरे, पशुपालन व्यवसाय या विषयावर महापौर संजय नरवणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला मनपा आयुक्त हेमंतकुमार पवार, उपमहापौर संध्या टिकले, स्थायी समिती सभापती तुषार भारतीय, सभागृहनेता सुनील काळे, गटनेता चेतन पवार, दिनेश बूब, नगरसेवक अजय सारसकर, उपायुक्त महेश देशमुख, शहर अभियंता जीवन सदार, पशुशल्य चिकित्सक सुधीर गावंडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम, सहाय्यक पशुशल्य चिकित्सक सचिन बोन्द्रे, कार्यशाळचे उपअभियंता स्वप्निल जसवंते, गुणसागर गवई उपस्थित होते.रॅबिज आजाराला आळा घालणे तथा मोकाट श्वानांच्या उत्पत्तीवर नियंत्रण असण्याच्या दृष्टीने अॅनिमल बर्थ कंट्रोल पल्स २००१ च्या तरतुदीनुसार भटक्या कुत्र्यांचे नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात येत असून गेल्या वर्षभरात ११,३४७ मोकाट श्वानांची नसबंदी करण्यात आल्याचे पशुवैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले. यामध्ये नर व मादी श्वानांच्या शस्त्रक्रियेचे गुणोत्तर प्रमाण १७:१७:८३ असे आहे. मोकाट जनावरांना पकडण्याच्या वाहनात नियमानुसार सुधारणा करण्याच्या सूचना सभेदरम्यान देण्यात आल्या. तसेच पशुधारकांचे जनावरे वारंवार मोकाट अवस्थेत पकडण्यात आल्यास संबंधित पशुपालकास त्या जनावरांचे दुप्पट किंवा तिप्पट शुल्क आकारले जाणार आहे. या दरम्यान मागील तीन वर्षात म्हणजेच २०१५-१६ मध्ये ७६६ मोकाट जनावरे, २०१६-१७ मध्ये १४९० मोकाट जनावरे व १ एप्रिल २०१७ ते आजपर्यंत ४५७ मोकाट जनावरांना बंदीस्त करण्यात आले असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली. मोकाट वराह भटकताना आढळल्यास त्यास ताबडतोब मारून टाकता येईल आणि आयुक्त निर्देश देईल अशा रितीने त्या वराहाच्या प्रेताची विल्हेवाट लावता येईल आणि अशा रितीने मारून टाकलेल्या कोणत्याही वराहबद्दल भरपाई मिळण्यासाठी कोणताही दावा सांगता येणार नाही. आयुक्तांच्या लेखी परवानगीशिवाय किंवा अशा परवानगीच्या अटींना धरून असेल त्याव्यतिरिक्त अन्य रितीने, शहराच्या कोणत्याही भागामध्ये कोणतेही वराह, घोडे, गुरेढोरे, बकऱ्या, मेंढ्या, गाढवे किंवा आयुक्त जाहीर नोटशीद्वारे वेळोवेळी निर्देश देईल, अशी अन्य चतुष्माद जनावरे पाळता कामा नये इत्यादी बाबींवर चर्चा करण्यात आली.जनावरे पाळणे किंवा मारून टाकणे या संदर्भात यावेळी सविस्तर चर्चा झाली. आयुक्तांच्या लेखी परवानगीशिवाय किंवा अटींना धरून असेल त्याव्यतिरिक्त अन्य रितीने शहराच्या कोणत्याही भागात वराह, घोडे, गुरेढोरे, बकऱ्या, मेंढ्या, गाढव किंवा आयुक्त जाहीर नोटीसद्वारे वेळोवेळी निर्देश देईल अशी अन्य चतुष्पा जनावरे पाळता कामा नये किंवा पाळू देता कामा नये, अशी कायदेशीर तरतूद असल्याचे आयुक्तांनी बैठकीत स्पष्ट केले.
शहरात जनावरे पाळण्यासाठी मनपाची परवानगी आवश्यक
By admin | Published: June 30, 2017 12:25 AM