अमरावती : महापालिकेच्या शौचालय घोटाळाप्रकरणी महापालिकेचे तत्कालीन मुख्य लेखाधिकारी प्रेमदास राठोड याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी अटक केली.
त्याला गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले असून वृत्त लिहिस्तोवर पीसीआरबाबत स्पष्ट झालेले नव्हते. महापालिकेच्या बडनेरा झोन अंतर्गत वैयक्तिक शौचालय योजनेत २ कोटी ४९ लाखांचा अपहार झाल्याचे जून २०२० मध्ये उघडकीस आले होते. त्यात कंत्राटी कर्मचारी संदीप राईकवार, महापालिकेच्या आस्थापनेवरील अनूप सारवान व ‘ज्ञानपुष्प’ नामक संस्थेचा अध्यक्ष योगेश कावरे याच्यासह आणखी सहा जणांना यापूर्वीच आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. आता एकूण शौचालय घोटाळ्यातील आरोपींची संख्या १० झाली आहे. त्या प्रकरणात हलगर्जी व अनियमितता झाल्याचा ठपका आर्थिक गुन्हे शाखेने तपासदरम्यान ठेवला होता. त्यामुळे तत्कालीन लेखाधिकारी म्हणून प्रेमदास राठोेड याची जबाबदारी अधिक असल्याने या प्रकरणात संशयाची सुई त्याच्यावरच येऊन ठेपली होती. तेव्हापासून या प्रकरणाची चौकशी सुरू होती. उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यामुळे प्रेमदास राठोड याने मंगळवारी जिल्हा न्यायालयात आत्मसमर्पण केले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर आर्थिक गुन्हे शाखेने त्याला कारागृहामधून ताब्यात घेऊन अटक केली. या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी म्हणून राठोड याला अटक झाल्यामुळे या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे, हे तपासात पुढे येणार आहे.
कोट
आतापर्यंत शौचालय घोटाळा प्रकरणात १० आरोपींना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. याप्रकरणी आणखी धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.
- शिवाजी बचाटे, पोेलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा