लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेच्या प्रस्तावित सार्वत्रिक निवडणुकीसाठीची बहुप्रतीक्षित महिला आरक्षणाची सोडत मंगळवारी काढण्यात आली. या सोडतीमुळे अनेक दिग्गजांसमोर प्रभाग बदलून निवडून येण्याचे आव्हान असणार आहे; तर, अनेक ठिकाणी पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी एकाच पक्षाच्या दोन मावळत्या नगरसेवकांमध्ये मोठी चुरस पाहावयास मिळणार आहे. एकूण ९८ पैकी तब्बल ३२ जागा खुल्या असून, तेथेच सर्वाधिक चुरस व स्पर्धा असेल. एकंदरीतच महिला आरक्षणाने अनेकांची समीकरणे बिघडविली आहेत.९८ सदस्यीय अमरावती महापालिकेत ४९ महिला सदस्य असतील. त्या अनुषंगाने येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता एस.सी., एस.टी. व सर्वसाधारण महिलांसाठीची प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यास सुरुवात झाली. महापालिका शाळेतील बालकांच्या हस्ते ती सोडत काढली गेली; तर, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी ते आरक्षण घोषित केले. मंगळवारी एस.सी.साठी राखीव असलेल्या १७ जागांपैकी ९, एस.टी.च्या दोनपैकी एक व सर्वसाधारण संवर्गातील नऊ जागांवरील महिला आरक्षण निश्चित करण्यात आले. आरक्षण सोडतीसाठी अनेक माजी नगरसेवकांसह इच्छुकांनी भवन गाठून आपापल्या प्रभागांतील समीकरणे जाणून घेतली. सोडतीसाठी उपायुक्त सुरेश पाटील, सहायक निवडणूक अधिकारी अक्षय निलंगे उपस्थित होते.
साईनगरातून माजी महापाैर की भारतीय?साईनगर प्रभागातील अ जागा एससी महिला, ब जागा खुली महिला अशी आरक्षित आहे; तर क जागा खुली आहे. गतवेळी माजी महापौर चेतन गावंडे व तुषार भारतीय येथून निवडून आले. मात्र यंदा एकच जागा खुली असल्याने तेथे तुषार भारतीय की चेतन गावंडे हा यक्षप्रश्न भाजपसमोर उभा ठाकणार आहे. कुणाला उमेदवारी मिळेल, याकडे लक्ष आहे.
बुधवारा प्रभागात इंगोले व्हर्सेस कलोती?बुधवारा प्रभागातील क जागा खुली आहे. त्यामुळे माजी महापौर विलास इंगोले व माजी स्थायी सभापती विवेक कलोती समोरासमोर ठाकण्याची चिन्हे आहेत. गतवेळी ते एकाच प्रभागातून निवडून आले असले तरी त्यांची समोरासमोर लढत झाली नव्हती. विक्रमादित्यासमोरची लढत टाळायची असेल, तर कलोतींना प्रभाग बदलल्याशिवाय पर्याय नाही.
भाजपची तिकिटे कुणाला मिळणार?मागील निवडणुकीत काही प्रभागांत भाजपचे संपूर्ण पॅनेल निवडून आले. मात्र यंदाची तीनसदस्यीय प्रभाग प्रणाली व महिला आरक्षणामुळे जागा एक आणि मावळते नगरसेवक दोन अशी परिस्थिती उद्भवली आहे. नवाथे अंबापेठचे उदाहरण घेतल्यास तेथून भाजपचे प्रणित सोनी व अजय सारस्कर निवडून आले. मात्र यंदा या प्रभागात एकच जागा खुली आहे. गडगडेश्वर प्रभागातही भाजपचे सचिन रासने व आशिष अतकरे हे दोन मावळते नगरसेवक आहेत.
खु्ल्या जागेवर मदार
९८ पैकी ४० जागा खुल्या आहेत. त्यांत सर्वाधिक ३२ जागा ‘क’ आहेत; तर ‘ब’मध्ये देखील ८ जागा सर्वसाधारण आहेत. त्यामुळे सर्वाधिक चुरस या ४० जागांवर असेल. महिलांसाठी असलेल्या ४९ जागांपैकी ३९ सर्वसाधारण, ९ एससी व एक एस.टी.ची आरक्षित आहे. १६ प्रभागांत प्रत्येकी दोन महिला असतील.
खुल्या प्रवर्गात चुरस
महिला आरक्षणाने अनेेक इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरले आहे. अनेकांना घरातील महिलांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करावे लागतील. खुल्या प्रवर्गात चुरस असेल.