अमरावती: सातव्या वेतन आयोगातील थकबाकी व महागाई भत्याची थकबाकी त्वरेने मिळावी, यासाठी महानगरपालिका कर्मचारी, कामगार संघाने १४ मेपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. गुरूवारीदेखील प्रशासनाच्या वतीने संपकरी कर्मचाऱ्यांशी बोलणी करण्यात आली. मात्र त्यात तोडगा न निघाल्याने संप सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. त्यामुळे गुरुवारीदेखील कामकाज बंद राहिले. दरम्यान, संप मागे न घेतल्यास प्रशासन ‘नो वर्क नो पे’ चा निर्णय घेईल, असा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे.
महानगरपालिका कर्मचारी, कामगार संघाने प्रशासनाला संघटनेची भूमिका सांगितली, तर दुसरीकडे आर्थिक परिस्थितीच नाही, तर संघटनेची तीन टप्प्यातली मागणी मान्य तरी कशी करावी, असा प्रश्न प्रशासनाकडून करण्यात आला. आज पुन्हा एकदा संघटनेसमोर प्रशासनाच्या वतीने आर्थिक सद्य:स्थिती ठेवण्यात आली. मात्र त्यातूनही तोडगा निघाला नाही. त्यामुळे सायंकाळी सहा वाजेपर्यंत महापालिका मुख्यालयासमोर एकत्र येत कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला. शुक्रवारी देखील संप सुरूच राहिल. मात्र त्यामुळे सामान्यांची ससेहोलपट झाली. अनेक कर्मचाऱ्यांनी एखादा तास थांबत सुटीचा आनंद घेतला.
या आहेत मागण्या
मनपातील सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा टप्पा दहा हजार रुपये विना विलंब द्यावा. आस्थापनेवरील व सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार महागाई भत्त्याची थकबाकी त्वरित द्यावी. अधिकारी, कर्मचारी व सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची सन २०१६ ते ३० एप्रिल २०२४ पर्यंतची प्रलंबित थकबाकीची रक्कम ही समान तीन किस्तीमध्ये दरवर्षी अंदाजपत्रकात मंजूर करावी. ती दर दिवाळी सणानिमित्त दरवर्षी तीन किस्तीमध्ये त्वरित द्यावी तथा आयुक्तांनी यापुर्वी दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करावी, अशी संघटनेची मागणी आहे.
उर्वरित कर्मचाऱ्यांशी सापत्न वागणूक का?
आम्हाला सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी संपाचे हत्यार उपसावे लागले आहे. तर दुसरीकडे केवळ १८ जणांना त्यांच्या ५५.४६ लाखांपैकी ४९.२९ लाख रुपये एकमुस्त देण्यात आले. त्यांना द्यायला आमचा अजिबात विरोध नाही. मात्र, त्यांना एकमुस्त देत असाल, किमान आम्हाला तीन हप्त्यात तरी द्या, अशी मागणी कोतवाल यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली.
यांना मिळाली एकमुस्त थकबाकीरमेश कडू, निरज ठाकरे, उमेश फतवानी, बिट्टू डेंडुले, गजानन गुर्जर, अमोल साकुरे, लिना अकोलकर, आशा बोबडे, अजय जे. चव्हान, आशिष सातोकार, स्वप्निल जसवंते, प्रवीण इंगोले, कांचन राऊत, अर्चना इंगळे, प्रियंका रघुवंशी, कुणाल बांबल, सिध्दांत पडोळे व शेख हारूण या कर्मचाऱ्यांना ४९ लाख २९ हजार ७२८ रुपये अदा करण्यात आल्याचे संघटनेने म्हटले आहे.