फोटो पी १९ धामणगाव कारवाई
धामणगाव रेल्वे : राज्य शासनाने वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घोषित केलेल्या लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी नगर परिषद व पोलीस प्रशासन रविवारी रस्त्यावर उतरले. दुकानाचे शटर उघडे ठेवणाऱ्या तब्बल दीडशे जणांना नोटीस बजावण्यात आल्या.
धामणगाव शहरात दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढला आहे. गत आठ दिवसांत शहरात व तालुक्यात रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. तरीही काही दुकानदार स्वतःची कोरोना चाचणी करून न घेता दुकाने सर्रास उघडे ठेवत असल्याचा प्रकार शहरात वाढला. यादरम्यान साध्या वस्तूसाठीही नागरिक घराबाहेर बाहेर पडत आहेत. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे व दत्तापूरचे पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद शेळके यांनी रविवारी सकाळी कडक अंमलबजावणीला सुरुवात केली. शहरात विनाकारण फिरणाऱ्या काही नागरिकांना पोलीस प्रशासनाने चांगलाच चोप दिला. नगर परिषदेने दीडशे जणांना नोटीस जारी केल्या.
रविवार आठवडी बाजार असल्याने काही दुकानदारांनी दुकाने मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस प्रशासन व नगर परिषदेची कारवाई पाहता, त्यांनी तेथून पळ काढला. या कारवाईत मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, दत्तापूरचे पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद शेळके, दुय्यम ठाणेदार द्वारका अंबोरे, नगर परिषदेचे प्रमोद खराटे, युनिस खान पठाण, किशोर बागवान, अशोक यादव, प्रशांत रोकडे, अनिल मार्वे, तर पोलीस कर्मचारी विजय बघेल, सुधीर बावणे, रमेश दाते, सुरेश पवार सहभागी झाले.