इंदल चव्हाण
अमरावती : जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट कोरोना काळात मोठ्या प्रमाणात वाढला असून अनेकांना औषधोपचारानंतर त्याचे विपरीत परिणाम जाणवायला लागले आहे. मात्र, तक्रारीअभावी शासनाला अशा बोगस डाॅक्टरांवर कारवाई करण्यात अडचणी येत आहे. चांदूर बाजार तालुक्यात याबाबत आलेल्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाने कारवाई केली असून त्या बोगस डॉक्टरची डिग्री जप्त केल्याची माहिती आहे.
जिल्हा लोकसंख्येच्या तुलनेत विभागात सर्वात मोठा आहे. शहरी भागांसह १५४७ खेडेगावांत विभागलेला आहे. वाडी-वस्ती, बेडा, तांडा, ढाणा आदी अनेक भागात आजही शासकीय यंत्रणा पोहचत नाही. अशा ठिकाणी बोगस डॉक्टर शिरून रुग्णांना लुबाडण्याचा प्रयत्न करतात. इतकेच नव्हे तर त्यांच्या आरोग्याशी खेळ करतात. यातून जिल्ह्यात सद्यस्थितीत एक डॉक्टर बोगस चांदूर बाजार तालुक्यात आढळून आल्याने त्याचेविरुद्ध शासनाने कारवाई केली आहे.
जिल्ह्यातील अनेक भागात बोगस डॉक्टर कार्यरत असून, त्यांच्याविरुद्ध कुणी तक्रार करीत नसल्याने ते बिनधास्त रुग्णांवर उपचार करून पैसे उकळत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. यासंदर्भात चांदूर बाजार तालुक्यातून एक तक्रार प्राप्त झाल्याने जिल्हा आरोग्य प्रशासनामार्फत त्या डॉक्टरविरुद्ध कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. बोगस डॉक्टरांकडून वापरल्या जाणाऱ्या औषधी अतिशय पावरफुल राहत असल्याने त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. यातून अनेकांना धोका झालेला आहे.
बॉक्स
तक्रार आली तरच कारवाई
बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी काही नियमावली आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे. तालुका स्तरावर गटविकास अधिकाऱ्यांच्या नेतृत्वातही समिती आहे. या समितीकडे तक्रार केल्यानंतरच संबंधित अधिकारी धाड टाकून कार्यवाही करीत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी दिली.
--
सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळ
रक्त होते कमी, हाडे ठिसूळ होतात
ग्रामीण बागात वैद्यकीय सेवा देणाो काही बोगस डॉक्टर विना डिग्री काम करीत आहेत. त्यांनी रुग्णांना तात्काळ उपचार मिळावा म्हणून प्रभावी औषधींचा हाय डोस देतात. यामुळे भविष्यात रुग्णांच्या शरीरातील रक्त कमी होऊ लागते. हाडेदेखील ठिसूळ बनतात. त्यातून पुढे अन्य आजार जडतात. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.
--
किडनीही होऊ शकते निकामी
वैद्यकीय सेवा देण्यासाठी राज्यात शासनाचे रजिस्ट्रेशन सक्तीचे आहे. मात्र, काही डॉक्टर नॅचरोपॅथी डिग्री घेऊन स्वत: ॲलोपॅथीची प्रॅक्टीस करताना दिसत आहे. त्यांच्याकडे वैद्यकीय रजिस्ट्रेशन नसते. त्यांनी केलेले औषधोपचार किडनीला सहन झाल्यास कालांतराने किडनीचा आजार जडतो. शरीराची पाचनशक्ती कमी होऊन शारीरिक कमजोरी आल्याने पुढे किडनी निकामी होण्याची संभावना असते. त्यामुळे अशा बोगस डॉक्टरांकडून औषधोपचार घेऊ नये, जाणकारांनी अशा डॉक्टरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रार केल्यास समितीद्वारा संबंधितावर योग्य कारवाई केली जाते.
--
शुगरच्या रुग्णांना ग्लुकोजची औषधी
बोगस डॉक्टर मनमर्जीनुसार औषधी देतात. यात रुग्णाला शुगर असला तरी ग्लुकोजची सलाईन लावली जाते. अतिशय उच्च रक्तदाब असल्यानंतरही त्याला सलाइनच्या माध्यमातून उपचार देण्याची प्रक्रिया राबविली जाते. हा प्रकार रुग्णांच्या अंगलट येण्याची संभावना असते. रुग्ण आणि त्याचे नातेवाईक याबाबत अनभिज्ञ असतात. डॉक्टर गावातच असल्याने तो योग्य उपचार करीत असेल असाच काहींचा भ्रम असतो. मात्र, त्याचे परिणाम शरीरावर वाईट होतात. त्यामुळे बोगस डॉक्टरांकडून उपचार घेऊ नये, असे आवाहन डीएचओ रणमले यांनी केले आहे.