अमरावती - एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या करणाऱ्या दोघांना सश्रम जन्मठेप, प्रत्येकी एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. ही घटना ३१ जुलै २०२० रोजी रात्री गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शोभानगर येथे घडली होती. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. देशपांडे यांच्या न्यायालयाने ३१ जानेवारी रोजी हा निर्णय दिला. सागर गजानन खरड (२८) व धीरज ऊर्फ गोलू विश्वास ठाकरे (३१, दोघेही रा. शोभानगर) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पंकज गोकुल सिडाम (२६, रा. शोभानगर) असे मृताचे नाव आहे.
न्यायालयीन दोषारोपपत्रानुसार, घटनेच्या दिवशी ३१ जुलै २०२० रोजी रात्री १०:३० वाजता पंकज हा पुडी घेऊन येतो, असे म्हणून घरून निघाला. मार्गात एका दुकानाजवळ त्याचा सागर व धीरजसोबत वाद झाला. या वादात धीरजने पंकजला तुला चाकूने मारतो, अशी धमकी दिली. त्यानंतर धीरज व सागर तेथून निघून गेले. काही वेळाने ते दोघेही तेथे परतले. यावेळी सागर व धीरजने पंकजला पकडून खाली पाडले. त्यानंतर त्याच्यावर चाकूने हल्ला चढविला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पंकजला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी मृतक पंकजच्या बहिणीने गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाअंती आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. सदर प्रकरणात न्या. एम. आर. देशपांडे यांच्या न्यायालयात १४ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. साक्षीदारांची साक्ष व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्या. एम. आर. देशपांडे यांच्या न्यायालयाने आरोपी सागर व धीरजला सश्रम जन्मठेप, प्रत्येकी एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता मंगेश श्रीधर भागवत यांनी यशस्वी युक्तिवाद केला. पैरवी अधिकारी म्हणून देवराव डकरे व पोलिस कॉन्स्टेबल अरुण हटवार यांनी काम पाहिले.