संशयित ताब्यात : क्षुल्लक वादातून हत्या झाल्याचा संशयटाकरखेडा (संभू) : साऊर ते शिराळा मार्गावरील एका ढाबा मालकाची हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी वलगाव पोलिसांनी एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ही हत्या क्षुल्लक कारणावरुन झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.शिराळा नजीकच्या कळमगव्हाण येथील राजेंद्र नारायण रोंघे ( ४८), असे मृताचे नाव आहे. साऊर ते शिराळा मार्गावरील कळमगव्हाण येथून दोन किमी अंतरावरील बाबूराव मानकर यांच्या शेतात ढाबा चालवित होते. राजेंद्रच्या हत्येप्रकरणी प्रवीण तुळशिदास कडू (३४) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ढाबा मालकाच्या हत्येचे गूढ कायमपोलीस माहितीनुसार, बाबूराव मानकर यांच्या मालकीच्या शेतातील ढाबा चार महिन्यांपूर्वी राजेंद्र रोंघे यांनी चालविण्यास घेतला होता. सोमवारी रात्री ११.३0 वाजता ढाब्यावरुन दोन ग्राहक जेवण करुन गेले. त्यावेळी या ढाब्यावर राजेंद्र रोंघे, त्यांचा मुलगा राहुल (२१) व शेजारी प्रवीण कडू असे तिघे जण होते. रात्री राहुलने ढाब्यावर झालेल्या व्यवसायाची रक्कम सोबत घेतली व प्रवीण कडू याला राजेंद्रसोबत ढाब्यावर राहण्याबाबत सांगून निघून गेला. राजेंद्रच्या घराचे बांधकाम सुरु असल्याने त्यांचा परिवार प्रवीणच्या घरीच राहत आहे. रात्री १ वाजताच्या सुमारास प्रवीण हा घरी आला व त्याने हात, पाय व चेहरा धुतला. याचवेळी राजेंद्रची पत्नी रत्नाबाई यांना जाग आली. त्यांनी प्रवीणला का आला म्हणून विचारणाही केली. परंतु ढाब्यावर आपल्याला झोप येत नसल्याचे कारण सांगून त्याने वेळ मारुन नेली.मंगळवारी सकाळी ८ वाजता राजेंद्रचा मुलगा राहुल हा ढाब्यावर गेला असता ढाब्यासमोर त्याच्या वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. घाबरलेल्या स्थितीत राहुल पुन्हा गावात आला व त्याने वडीलांच्या स्थितीची माहिती आपल्या परीवाराला दिली. सार्यांनीच घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांनाही घटनेची माहिती दिली. वलगावचे ठाणेदार शिरीष राठोड यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळ गाठून तपासाला प्रारंभ केला. विटा डोक्यावर मारुन गंभीर जखमी करण्यात आले व अतिरक्तस्त्राव झाल्याने राजेंद्रचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सोमनाथ गार्गे, सहायक पोलीस आयुक्त तडवी यांनीही पोलीस ताफ्यासह घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. (वार्ताहर)
शिराळानजीक ढाबा मालकाची हत्या
By admin | Published: June 03, 2014 11:44 PM