चांदूर रेल्वे : तालुक्यातील कळमगाव येथे ४१ वर्षीय शेतमजूर व्यक्तीचा मानेवर विळ्याने वार करून खून करण्यात आला. बुधवारी रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. विकास प्रल्हाद गवई (४१, रा. कळमगाव) असे मृताचे नाव आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्रीच्या सुमारास कळमगाव येथील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. नेमकी ती संधी साधत अंधारात गावातील बुद्धविहाराजवळ विकास प्रल्हाद गवई याच्या मानेवर अज्ञाताने विळ्याने हल्ला केला. मानेवर जबर वार झाल्याने गवई यांचा जागीच मृत्यू झाला.
खून झाल्याची माहिती मिळताच चांदूर रेल्वेचे ठाणेदार मगन मेहते, सहायक ठाणेदार राऊत, बीट जमादार संदीप शिरसाट व चालक जगदीश राठोड घटनास्थळी पोहचले. पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनाकरिता चांदूर रेल्वे येथाल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. खून नेमका कोणी केला व कुठल्या कारणावरून झाला, याचा अधिक तपास ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनात चांदूर रेल्वे पोलीस करीत आहेत. आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे.