वरुड/पुसला : शेतीच्या धुऱ्याच्या वादातून ६० वर्षीय शेतकऱ्याची काठीने मारहाण करून हत्या करण्यात आली. धूलिवंदनाच्या दिवशी सोमवारी दुपारी तालुक्यातील हुमनपेठ शिवारात ही घटना घडली. पुरुषोत्तम पाटील (६० रा. पुसला) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गजानन चौधरी (४२, रा. पुसला) व योगेश जोगेकर (३८, रा. शेंदूरजनाघाट) अशी वरूड पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.
पुरुषोत्तम पाटील व आरोपींचे हुमनपेठ शिवारात लागूनच शेत आहे. गजानन चौधरी हा नेहमीच धुरा उकरून वाद घालत होता, तर योगेश जोगेकर स्वत:हाच्या म्हशी मृताच्या शेतात चारून पिकांचे नुकसान करीत होता. २९ मार्च रोजी दुपारच्या सुमारास पुरुषोत्तम पाटील शेतात गेले होते. सायंकाळी घरी परत आले नाही म्हणून मृताच्या मुलाने शेतात जाऊन शोध घेतला तेव्हा त्यांची सायकल आणि आरोपीची दुचाकी शिवारात दिसली. शेतातील झोपडीत जाऊन पाहिले असता, वडील मृतावस्थेत दिसले. यावेळी मृतकाच्या पाठीवर, पायावर, पोटावर काठीने जबर मारहाण करून हत्या झाल्याचे निदर्शनास आले. याबाबतची माहिती शेंदूरजनाघाट पोलिसांना देण्यात आली. उपनिरीक्षक सचिन कानडे, जमादार लक्ष्मण साने यांनी पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे यांनी भेट दिली.
--------