अमरावती : केंद्र शासनाच्या 'एनआरसी' व 'सीएए'ला विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील उम्मत हेल्पलाईन या मुस्लीम महिलांच्या संघटनेद्वारा तसेच अमरावती वुमेन्स अॅन्ड गर्ल्स एॅक्शन कमिटी या विद्यार्थिनींच्या संघटनेद्वारा शुक्रवारी दुपारी गर्ल्स हायस्कूल चौकातून मोर्चा काढण्यात आला. यावेळी मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिका-यांना देण्यात आले. मुस्लीम महिला रस्त्यावर उतरल्याची जिल्ह्यात ही पहिलाच घटना आहे.
केंद्र शासन हिंदू व मुस्लीम समाजाच्या भावनेशी खेळत असल्याचा आरोप सभेदरम्यान करण्यात आला. या विधेयकाला विरोध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत झालेत. निवेदन देताना निलोफर यास्मीन अब्दूल हकीम, शंगुफ्ता प्रवीण रफीक अहमद, कैशर शोएब खान, डॉ. शबनम हुसेन, हाजिबाबी मिसबाह एरम, कौसर खान, हाबिजाबी युसूफ, आफरीम बानो, जोहाखान, वाजेदा खान यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.
शुक्रवारी बडनेरात मुस्लीम बांधवांनी रॅली काढून या विधेयकाचा निषेध नोंदविला. विश्रामगृहापासून रॅलीला सुरुवात झाली. रॅलीचा शेवट इर्विन स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ झाला. रॅलीदरम्यान ठाणेदार शरद कुळकर्णी पोलीस बंदोबस्तासह उपस्थित होते.