पालक पोहोचलेच नाहीत : पोलिसांचा दुसऱ्या अंगाने तपास सुरूबडनेरा : दहा वर्षीय बालकाचे अपहरण करून पोत्यात बांधून नागपूरहून रेल्वेने बडनेऱ्यात आणल्याची घटना ३ मे रोजी मध्यरात्री उघडकीस आली. यामुळे येथे एकच खळबळ उडाली होती. नागपूरचा १० वर्षीय योगेश शालिकराम भिसेन हा मुलगा घराजवळ खेळत असताना त्याला एका अपंग व्यक्तीने आवाज दिल्याने मी त्याच्याजवळ गेलो असता त्या अपंग व्यक्तीने माझ्या तोंडाला चिकटपट्टी बांधली व पोत्यात टाकले व मला अपंग व्यक्तीने रेल्वेत बसविले. रेल्वे डब्याच्या शौचालयातून योगेशला बडनेऱ्यात उतरविले, असे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर दहा वर्षीय बालकास पोत्याच्या बाहेर काढले व अपंग व्यक्तीने त्याला धमकाविले. त्यामुळे मुलगा घाबरला होता. दोघेही रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपले असताना मुलाने रात्री ११ वाजता पळ काढला. तो जुन्यावस्तीच्या बाजूने असलेल्या गांधी विद्यालय परिसराकडे गेला. रात्री एकटा लहान मुलगा फिरत असल्याचे पाहून त्या परिसरातील युवकांनी त्याची विचारपूस केली. त्या युवकांनी याची माहिती एका संस्थेचे अध्यक्ष योगेश कावरे यांना दिली. त्यांनी या बालकास मध्यरात्रीच बडनेरा पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याच्या आई-वडिलांनी पत्ता मिळविल्यानंतर संपूर्ण अपहरण प्रकरणातून सुटकेचा श्वास घेतला. या घटनेनंतर पोलिसांनी अपहरण प्रकरणाचे सत्य जाणून घेतले असता वेगळेच तथ्य समोर आले. बडनेरा पोलिसांनी ४ मे रोजी अपहरण झालेल्या मुलाच्या आई-वडिलांना संपर्क साधला तुमच्या मुलाचे अपहरण झाले आहे असे सांगण्यात आले. पहिल्या दिवशी मुलाला घेण्यास येतो, असे पोलिसांना सांगण्यात आले. मात्र उशीरा रात्रीपर्यंत त्याचे आई-वडील बडनेऱ्यात पोहोचलेच नाही. पुन्हा ५ तारखेला सकाळी पोलिसांनी संपर्क साधला असता त्याच्या आईने मुलाला घेऊन जाण्यास नकार दिल्याचे पोलिसांच्या लक्षात आले त्याचे नेहमीचेच आहे कितीदा त्याला घेण्यास येऊ, असे मुलाच्या आईने म्हटले तर त्या ठिकाणच्या बालसुधार गृहातच ठेवा असे म्हटल्यावर बडनेरा पोलिसांनी सदर मुलास ५ मे रोजी अमरावतीच्या रुख्मिणीनगरातील बालसुधारगृहात पाठविले. ज्या अपंग इसमाने दहा वर्षीय मुलाचे अपहरण केले. अपहरणकर्त्याचे नाव वासुदेव आनंद नीळकंठ (रा. नागपूर) असे आहे. त्याच्या मते या मुलास मी गोंदियावरून रेल्वेत आणले. हा मुलगा रेल्वे स्थानकावर प्लास्टीकच्या पन्न्या, बॉटल्स जमा करतो.तो रेल्वेस्थानकावर नशेचे द्रव्य पीत होता. त्याला मी बडनेरला चलतो का, असे विचारले. तो येण्यास तयार झाला. मी त्याला जेवणसुद्धा दिले. मी रेल्वेत भीक मागून माझा उदरनिर्वाह करतो मी दोन्ही पायाने अपंग आहे. मी त्या मुलाला पोत्यात आणलेच नाही. त्याने खोटी बतावणी केली, असे अपहरण करवून आणलेल्या व्यक्तीने बडनेरा पोलिसांसमोर सांगितले. सदर प्रकरणाची सत्यता त्याचे आई-वडील प्रत्यक्ष येथे आल्यावरच समोर येऊ शकते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. (शहर प्रतिनिधी)
‘त्या’ अपहरणाचे रहस्य गुलदस्त्यात
By admin | Published: May 06, 2016 12:10 AM