सध्या हरभरा काढणीचा मोसम सुरू असून, या पिकावर शेतकऱ्यांची भिस्त आहे. या पिकाच्या उत्पादनातून शेतकरी खरीप हंगामातील पेरणीकरिता आर्थिक नियोजन करीत असतो. यंदा खुल्या बाजारात हरभऱ्याचे दर कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्राकडे नोंदणी केली आहे. शासकीय दरानुसार शेतकऱ्याचा हरभरा हा ५१०० रुपये प्रतिक्विंटलने शासकीय खरेदी केली जात आहे.
नाफेडच्या खरेदीसाठी १५ फेब्रुवारीपासून स्थानिक खरेदी-विक्री कार्यालयात हरभरा विक्रीसाठी नोंदणी सुरू झाली. त्यात तालुक्यातील १४९१ शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. या शासकीय खरेदीला शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी खरेदी विक्री संस्थेकडून प्रथम माल विक्रीस आणणारे शेतकरी नामदेव शेखार यांना दुपट्टा, टोपी व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी खरेदी-विक्री संस्थेचे अध्यक्ष शिवाजी बंड, उपाध्यक्ष श्रीपाद आसरकर, बाजार समितीचे सभापती सतीश धोंडे, खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक अशोक शिनकर, बाजार समितीचे सचिव मनीष भारंबेसह सर्व संचालक व विदर्भ मार्केटिंग फेडरेशनचे जिल्हा पणन अधिकारी उमेश देशपांडे उपस्थित होते. शेतकऱ्यांनी सूचनेनुसार त्या वेळेत आपला हरभरा विक्रीस आणण्याचे आवाहन खरेदी-विक्री संस्थेकडून करण्यात आले आहे.
-------------